देवनार डंपिंग ग्राउंड स्वच्छतेसाठी बीएमसीकडून टेंडर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. राज्य सरकारने चार महिन्यांपूर्वी निर्देश दिल्यानंतर बीएमसीने देवनार डंपिंग ग्राउंडवरील 185 लाख टन जुना कचरा साफ करण्यासाठी आणि 110 हेक्टर जमीन पुनर्प्राप्त करण्यासाठी 2,368 कोटी रुपयांचा निविदा प्रस्ताव जाहीर केला आहे. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
विरोधकांचा आरोप, कारण काय?
मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये राज्य मंत्रिमंडळाने या भूभागाचा काही भाग धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली होती. हा प्रकल्प राज्य सरकार व अदानी समूह यांच्यातील संयुक्त उपक्रमाद्वारे राबवला जात आहे. विशेषतः फुकट घरासाठी अपात्र ठरलेल्या धारावी रहिवाशांचे पुनर्वसन या प्रकल्पांतर्गत होणार आहे.या उपक्रमासाठी स्वच्छ भारत मिशनचा आधार घेतला जात असल्याचे बीएमसी अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी, विरोधकांनी या प्रकल्पावर टीका करत सार्वजनिक पैशांचा वापर खासगी हितासाठी होत असल्याचा आरोप केला आहे.

कचरा व्यवस्थापनात ‘देवनार’चं महत्व
देवनार हे मुंबईतील एक प्रमुख आणि जुने कचरा डेपो आहे. हे भारतातील सर्वात मोठ्या कचरा साठवण स्थळांपैकी एक मानले जाते. मुंबई शहरातून दररोज हजारो टन कचरा निर्माण होतो आणि त्यातील मोठा हिस्सा देवनार डंपिंग ग्राऊंडमध्ये टाकला जातो. देवनार कचरा व्यवस्थापन केंद्राची स्थापना 1927 साली झाली. या ठिकाणी सांडपाणी, घरगुती कचरा, प्लास्टिक, जैविक व अजैविक कचरा मोठ्या प्रमाणावर जमा केला जातो.
मात्र, इथे साठणाऱ्या कचऱ्यामुळे अनेक पर्यावरणीय व आरोग्यसंबंधी समस्या उद्भवतात. धूर, दुर्गंधी, रोगराई, वायू प्रदूषण हे मुख्य प्रश्न आहेत. त्यामुळे देवनारचे महत्त्व केवळ कचरा साठवण्यापुरते मर्यादित नसून, योग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या महानगरपालिका आणि विविध संस्था कचरा व्यवस्थापनाच्या सुधारित उपाययोजनांवर काम करत आहेत, जसे की कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर, कंपोस्टिंग आणि वेस्ट-टू-एनर्जी तंत्रज्ञान. वाढत्या शहरीकरणामुळे कचरा व्यवस्थापन ही एक मोठी जबाबदारी बनली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून, कचरा कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. देवनार हे उदाहरण आहे की, कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी किती महत्त्वाची आहे. त्यामुळे आता या टेंडर प्रक्रियेला विशेष महत्व आहे.