८ नोव्हेंबर २०१६ रोजी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली, त्यानंतर गल्ली-मोहल्ल्यातील सर्व एटीएमसमोर प्रचंड गर्दी झाली होती. लोक पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहत होते. त्या दिवशी रांगेत उभे असलेल्या प्रत्येकाने एटीएमचे महत्त्व नक्कीच समजले असेल. आज जरी डिजिटल पेमेंटच्या युगात एटीएमची गरज थोडीशी कमी झाली असली, तरी डिजिटल सुविधा नसताना एटीएम म्हणजे अत्यंत उपयुक्त सुविधा होती. जगाला पहिले एटीएम मिळाले होते तुम्हाला माहीत आहे का?. चला, त्याच्या शोधाची कहाणी जाणून घेऊया.
जगातले पहिले एटीएम कधी सुरू झाले?
२७ जून १९६७ रोजी लंडनच्या एन्फिल्ड परिसरात जगातील पहिले एटीएम सुरू करण्यात आले. याला ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे एटीएम बार्कलेज बँकेच्या शाखेबाहेर बसवण्यात आले होते. आज जरी लोक निर्धास्तपणे एटीएम वापरत असले, तरी तेव्हा जेव्हा लोकांनी प्रथमच मशीनमधून पैसे बाहेर येताना पाहिले, तेव्हा संपूर्ण जग चकित झाले होते. या एटीएममधून सर्वात पहिले पैसे ब्रिटिश अभिनेते रेग वर्नेय यांनी काढले होते. आज या सेवा संपूर्ण जगभर विस्तारलेल्या आहेत.

एटीएमचा विचार कसा सुचला?
या मशीनचे शोधक जॉन शेफर्ड-बॅरन मानले जातात. असं म्हणतात की जॉन जेव्हा बँकेत पैसे काढण्यासाठी जायचे, तेव्हा त्यांना रांगेत तासंतास थांबावं लागायचं. शनिवार-रविवारी बँक बंद असायची, तेव्हा तर पैसे काढणे शक्यच नसायचं. यामुळेच त्यांच्या मनात अशी मशीन बनवण्याची कल्पना आली. एका दिवशी ते घरी आल्यावर अंघोळ करत असताना त्यांना सुचले की जसं चॉकलेट वेंडिंग मशीनमधून चॉकलेट मिळू शकते, तशीच पैसे देणारी मशीनही का नसावी?
लंडनमधील पहिले एटीएम – आज काय स्थिती आहे?
लंडनमधील हे पहिले एटीएम आता खूपच बदलले आहे. २०१७ मध्ये, जेव्हा या एटीएमला ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा ते सोनेरी रंगात सजवले गेले. हे मशीन आजही त्या बार्कलेज बँकेच्या शाखेत लावलेले आहे.
भारतात एटीएम कधी आले?
भारतामध्ये पहिले एटीएम १९८७ साली लावण्यात आले. मुंबईमधील एचएसबीसी (हॉंगकॉंग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन) या बँकेच्या शाखेत हे मशीन बसवण्यात आले होते. रिझर्व्ह बँकेनुसार, सप्टेंबर २०२० पर्यंत भारतात एकूण २,३४,२४४ एटीएम मशीन कार्यरत होती.
जॉन शेफर्ड यांनी सुरुवातीला एटीएमचा पिन सहा आकड्यांचा ठेवला होता. पण त्यांच्या पत्नीला तो लक्षात ठेवताना अडचण येत असल्याने नंतर तो बदलून चार आकड्यांचा केला गेला