गुगलने आपल्या अत्याधुनिक जनरेटिव AI व्हिडिओ तंत्रज्ञान Veo 3 आता भारतातही अधिकृतपणे उपलब्ध केल्याची घोषणा केली आहे. या टूलचे प्रथम प्रदर्शन काही आठवड्यांपूर्वी Google I/O कॉन्फरन्समध्ये करण्यात आले होते. सध्या हे फीचर फक्त Gemini ‘Pro’ सब्स्क्रिप्शन असलेल्या वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध आहे.
Veo 3 च्या मदतीने युजर्स ८ सेकंदांपर्यंतचे लघु व्हिडिओ क्लिप्स तयार करू शकतात. या क्लिप्समध्ये केवळ व्हिज्युअल्स नव्हे तर आवाज, बॅकग्राउंड म्युझिक, आणि साउंड इफेक्ट्स यांचाही समावेश करता येतो. वापरकर्ते बोलणाऱ्या आवाजांचे सिंथेसिस, तसेच वास्तववादी आणि सिनेमा-प्रमाणे प्रभाव निर्माण करणारे पार्श्वसंगीतदेखील जोडू शकतात.

गुगलचे म्हणणे काय?
गुगलने म्हटले आहे, “तुम्हाला इतिहास एका आधुनिक सोशल मीडिया इन्फ्लुएंसरच्या दृष्टीकोनातून मांडायचा असेल, किंवा काचेसारख्या सफरचंदाच्या तुकड्यांवर होणाऱ्या आवाजाची कल्पना करायची असेल, किंवा बिगफूटसारख्या मिथिकल पात्रांना व्हिडिओमध्ये दाखवायचे असेल — Veo 3 तुमच्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी तयार आहे. आमची टीम हे तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने काम करत आहे.”
२० मे रोजी झालेल्या Google I/O वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये या मॉडेलचे औपचारिक अनावरण झाले. हे मॉडेल फक्त आकर्षक आणि सिनेमॅटिक व्हिडिओ तयार करण्यास सक्षम नाही, तर अस्सल वाटणारे आवाज, संवाद, संगीत आणि साउंड इफेक्ट्स समाविष्ट करून संपूर्ण व्हिडिओला वास्तववादी बनवते.
AI व्हिडिओंवर वॉटरमार्क
गुगलने स्पष्ट केले आहे की Veo 3 ने तयार केलेल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दोन प्रकारचे वॉटरमार्क असतील. यात एक दृश्यमान वॉटरमार्क आणि दुसरे SynthID नावाचे अदृश्य डिजिटल वॉटरमार्क, जेणेकरून व्हिडिओ AI जनरेटेड आहे हे ओळखता येईल.
जबाबदारीने AI वापरण्याचा निर्धार
कंपनीने हेही स्पष्ट केले आहे की ती AI तंत्रज्ञानाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे. यासाठी Veo 3 वर सतत रेड टीमिंग आणि अनेक पातळ्यांवर चाचण्या केल्या जात आहेत, जेणेकरून कोणतीही चूक किंवा गैरवापर टाळता येईल.
Sora ला टक्कर देणारे तंत्रज्ञान
Google I/O नंतर अनेक वापरकर्त्यांनी Veo 3 ने बनवलेले व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले, ज्यामध्ये याचे उच्च दर्जाचे लिप-सिंकिंग, टेक्स्ट व इमेज प्रॉम्प्टिंग, आणि अस्सल फिजिक्सचे प्रभावी दर्शन पाहायला मिळाले. तज्ञांच्या मते, हे OpenAI च्या Sora टूलला सर्वात मोठी स्पर्धा ठरू शकते.