मुलींच्या शर्टला डाव्या बाजूलाच बटणं का असतात? त्यामागील फॅशन थिअरी जाणून घ्या

फॅशनच्या जगात प्रत्येक गोष्टीचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. मग ते कपड्यांचं डिझाईन असो की शर्टवरचे बटण कोणत्या बाजूला असावेत, हेदेखील. मुलांच्या तुलनेत मुलींसाठीच्या आउटफिट्स अधिक असतात. पण कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का की मुलींच्या शर्ट्स किंवा कुर्त्यांमध्ये बटणं नेहमी डाव्या बाजूला असतात, तर मुलांच्या कपड्यांमध्ये ती उजव्या बाजूला असतात?

ही गोष्ट काही नवीन ट्रेंड नाही, तर अनेक शतकांपासून चालत आलेली एक परंपरा आहे. आधुनिक फॅशन कितीही बदलत गेलं तरी काही क्लासिक स्टाइल्स आजही जसंच्या तसं टिकून आहेत. खरंतर बटणं कोणत्या बाजूला असावीत, यामागे केवळ सौंदर्य किंवा फॅशन नाही, तर त्यामागे इतिहास, सोयी-सुविधा आणि सामाजिक परंपराही दडलेल्या आहेत.

नेहमी डाव्या बाजूलाच का असतात बटणं?

आपण आज जाणून घेणार आहोत की मुलींच्या किंवा स्त्रियांच्या शर्ट्समध्ये बटणं नेहमी डाव्या बाजूला का असतात आणि याची सुरुवात कधी आणि कशी झाली.

१३व्या शतकापासून सुरू आहे ही पद्धत

असं मानलं जातं की १३व्या शतकात शर्ट घालणं ही केवळ श्रीमंत वर्गासाठीची गोष्ट होती. मोठ्या घरांमधील महिलांना कपडे घालण्यासाठी खास नोकर-मोलकरीण असायच्या, ज्या त्यांना कपडे घालून द्यायच्या. त्यामुळे कपडे सहज घालता यावेत म्हणून शर्टवर बटणं डाव्या बाजूला लावली जायची, जेणेकरून समोरून उभा असलेला दुसरा व्यक्ती सहज बटण लावू शकेल.

हीच परंपरा आजही स्त्रियांच्या कपड्यांमध्ये चालू आहे, जरी आता स्वतः कपडे घालण्याची गरज आणि सवय दोन्ही असली तरी फॅशन जगताने या पारंपरिक डिझाइनला कायम ठेवलं आहे.

पुरुषांच्या शर्टमध्ये बटण उजव्या बाजूला का असतात?

मुलांबाबत बोलायचं झालं, तर ते आपले शर्ट स्वतःच घालतात आणि स्वतःच बटण लावतात. म्हणूनच त्यांच्या शर्टमध्ये बटण उजव्या बाजूला असतात, जेणेकरून त्यांना बटण लावताना सोय होईल.

स्तनपान करताना सोपं पडतं

असंही मानलं जातं की महिलांना आपलं बाळ डाव्या बाजूला पकडून दूध पाजण्याची सवय असते. यासाठी त्यांना शर्टचे बटण उघडण्यासाठी उजव्या हाताचा वापर करावा लागतो. त्यामुळे महिलांच्या शर्टचे बटण डाव्या बाजूला ठेवले जातात, हीदेखील एक महत्त्वाची कारणीभूत बाब मानली जाते.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News