मुंबई- एसटी महामंडळाच्या प्रवाशांना आनंदाची बातमी आहे. 150 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तिकीट दरात ही सवलत 15 टक्के असणार आहे.
1 जुलैपासून सर्वसामान्यांसाठी ही योजना लागू होणार आहे. केवळ दिवाळी आणि उन्हाळ्याच्या काळात गर्दी अस्लयामुळे या योजनेला ब्रेक लागणार आहे. पूर्ण तिकीट घेणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात महिलांसाठी तिकिटात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लाडकी बहीण योजना राज्यात लागू करण्यात आली. आता एसटी ममहामंडळाच्या 77 व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं परिवहनमंत्र्यांनी एसटी तिकिटाच्या आगाऊ आरक्षण दरात 15 टक्के सूट देण्याच्या निर्णयाची घोषणा केलीय. 1 जुलैपासून ही योजना सुरु करणार असल्याचंही जाहीर करण्यात आलंय.
आषाढी आणि गणेशोत्सवामध्ये होणार लाभ
या योजनेचा लाभ आषाढी आणि गणेशोत्सवाच्या काळात होणार आहे. आषाढीला पंढरपुराला जाणाऱ्या भाविकांना या योजनेचा लाभ होणार आहे. भाविकांच्या आगाऊ तिकीट दरात 15 टक्के सवलत मिळणार आहे. सणासुदीच्या काळात अतिरिक्त जागांना या योजनेचा लाभ होणार नाहीये. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनाही गणेशोत्सवात ही सवलत मिळणार आहे.