RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना एटीएममधून पैसे काढण्याबाबत एक मोठा आदेश जारी केला आहे. व्यवहार सोपे करण्यासाठी, RBI ने सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सना किमान एका कॅसेटमधून 100 रुपये किंवा 200 रुपये मूल्याच्या नोटा वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. साधारणपणे एका एटीएममध्ये 4 कॅसेट असतात. RBI च्या मासिक बुलेटिननुसार, 31 मार्चपर्यंत बँकेकडे 2.20 लाख एटीएम होते, तर व्हाईट लेव्हल एटीएमची संख्या 36 हजार आहे.
सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळेल
28 एप्रिलच्या अधिसूचनेनुसार, वारंवार वापरल्या जाणाऱ्या मूल्याच्या बँक नोटांपर्यंत लोकांची पोहोच वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, “सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्स त्यांच्या एटीएममधून नियमितपणे 100 आणि 200 रुपयांच्या मूल्याच्या बँक नोटा वितरित केल्या जातील, याची खात्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” बँकिंग तज्ञांचे म्हणणे आहे, की या निर्णयामुळे सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळेल. एटीएममधून लहान नोटा काढून घेतल्याने व्यवहार सोपे होतील.

30 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत
रिझर्व्ह बँकेने निर्देश दिले आहेत की 75% एटीएममध्ये 30 सप्टेंबरपर्यंत किमान एका कॅसेटमधून 100/200 च्या नोटा वितरित कराव्यात. त्याच वेळी, 90% एटीएममध्ये 31 मार्च 2026 पर्यंत किमान एका कॅसेटमधून 100 किंवा 200 च्या नोटा वितरित कराव्यात. यासोबतच, 500 रुपयांच्या नोटा देखील उपलब्ध असतील.