मुंबईकरांनो, रेल्वेचं ‘हे’ वेळापत्रक वाचा, नाहीतर तुम्ही अडकण्याची शक्यता, रविवारी मेगा ब्लॉक कुठे?

रविवारी रेल्वेच्या आभियांत्रिकी आणि विविध कामांसाठी तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर, मध्य रेल्वे मार्गावर आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांनी वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडावे.

मुंबई – रेल्वे लोकलबाबत मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईकरांनो, जर तुम्ही उद्या रेल्वेने प्रवास करणार असाल तर थांबा, आणि ही बातमी वाचा. कारण उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी (२७.०४.२०२५) रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रविवारी रेल्वेचं वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा, अन्यथा बाहेर अडकण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक कसा असणार?

दरम्यान, रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कांदिवली आणि बोरिवलीच्या मध्ये पूल क्रमांक ६१ वरील गर्डरची तसेच अन्य कामांसाठी पश्चिम रेल्वेने शनिवारपासून (२६ एप्रिल) ३५ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर मेगा ब्लॉक जाहिर केला आहे. आजपासून दुपारी १ ते रविवारी मध्यरात्रीनंतर १२ वाजेपर्यंत पुलाच्या कामासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहेत. दरम्यान, आज (शनिवारी) दुपारनंतर ७३ फेऱ्या आणि रविवारी दिवसभरात ९० फेऱ्या रद्द राहणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक कुठे?

दुसरीकडे रविवारी मध्य रेल्वेच्या आभियांत्रिकी आणि विविध कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतो. रविवारी ठाणे ते विद्याविहार दरम्यान सकाळी ८.०० वाजल्यापासून ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळं विद्याविहार स्थानकातून गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. आणि ठाणे स्टेशन येथे ५ व्या मार्गावर पुन्हा वळविल्या जातील, दरम्यान, ब्लॉकच्या दरम्यान, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक कुठे?

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गाप्रमाणे हार्बर रेल्वेवर देखील मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी, बेलापूर आणि पनवेल, चुनाभट्टी, वांद्रे स्टेशनदरम्यान अप हार्बर आणि डाऊन मार्गावर ११.१० वाजल्यापासून ते ०४.४० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. तसेच सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या सकाळी १०.४८ वाजल्यापासून ते दुपारी ०४.४३ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News