सर्व पीएफ खाती एकत्र करणे शक्य? पूर्ण रक्कम आणि पेन्शनही मिळवा, नेमकं कसं?

सर्व पीएफ खाती एकत्रित करणे आता शक्य होणार आहे. त्याचबरोबर पूर्ण रक्कम आणि पेन्शनही मिळवता येईल, नेमकं कसं ते जाणून घेऊ...

नोकरदारांच्या दैनंदिन जीवनात पीएफ अकाऊंटशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण होत असतात. त्यामध्ये पीएफची रक्कम आणि पेन्शनशी संबंधित अनेक प्रश्न असतात. आता तुमची जर एकापेक्षा अधिक पीएफ अकाऊंट असतील, आणि तुम्हाला ती एकत्रित करायची असतील तर ते शक्य होणार आहे. त्याचबरोबर सर्व खात्यांची पेन्शन देखील मिळवता येणार आहे. हातची नोकरी सोडून दुसरीकडे जाताना अनेकजण पीएफकडे दुर्लक्ष करतात.  यामुळे पुढे अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं.

ऑनलाईन पीएफ ट्रान्सफर कसा करावा?

ईपीएफओ पोर्टलवर लॉगीन करा, त्यासाठी तुमचा युएन आयडी आणि पासवर्ड वापरा.

त्यासाठी तुमची ईपीएफची केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन सर्व्हिसेस वर क्लिक करा.

वन मेंबर वन ईपीएफ अकाऊंट पर्याय निवडा.

ट्रान्सफर रिक्वेस्ट निवडा.

ज्या नोकरीतील पीएफ ट्रान्सफर करायचा आहे, तो नियोक्ता निवडा.

सध्याचा वा मागील नियोक्ता जो तुमचा दावा प्रमाणित करतो तो निवडा.

ओटीपी व्हेरीफिकेशन करून ट्रान्सफर रिक्वेस्ट सबमिट करा.

पीएफ ट्रान्सफर न केल्याचे तोटे

पीएफ ट्रान्सफर न केल्यास कर्मचारीला अनेक आर्थिक नुकसानांचा सामना करावा लागू शकतो. जुने खाते निष्क्रिय झाल्यास त्यावर व्याज मिळणे थांबते, ज्यामुळे रकमेची वाढ होत नाही. अनेक पीएफ खाती असल्यास त्यांची माहिती ठेवणे अवघड जाते आणि भविष्यात पैसे काढताना अडचणी येऊ शकतात. इनकम टॅक्स रिटर्नसाठीही एकच खाते उपयुक्त ठरते. शिवाय, पेंशनसाठी आवश्यक सेवा कालावधी योग्य प्रकारे मोजला जात नाही, कारण तो विभागून राहतो. यामुळे अंतिम लाभात कपात होऊ शकते. पीएफ ट्रान्सफर न केल्यास खातेदाराला कमी व्याज, प्रक्रिया गुंतागुंतीची आणि भविष्यातील लाभ मर्यादित होतात, त्यामुळे वेळेत ट्रान्सफर करणे महत्त्वाचे आहे.

पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी हे प्रत्येक कर्मचार्‍यासाठी एक महत्त्वाचे बचत साधन आहे. यामध्ये नोकरीदरम्यान दर महिन्याला पगारातून ठराविक रक्कम जमा केली जाते आणि त्यावर सरकारकडून व्याज दिले जाते. ही रक्कम निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य देण्यास मदत करते. अचानक येणाऱ्या आर्थिक गरजांमध्ये पीएफमधून पैसे काढता येतात, त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही आधार मिळतो. पीएफमुळे बचतीची सवय लागते आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन सुलभ होते. तसेच, नियोक्ता देखील ठराविक हिस्सा भरतो, त्यामुळे जमा रक्कम अधिक होते. निवृत्ती, आजारपण किंवा घरखरेदीसारख्या गरजांसाठी पीएफ उपयुक्त ठरतो. त्यामुळे प्रत्येक कामगारासाठी पीएफचे महत्त्व अत्यंत मोलाचे आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News