पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक अपडेट्स समोर येत आहेत. सासरचा जाच आणि पैशांसाठी तगादा यामुळे वैष्णवी हगवणेने जीवन संपवलं होतं. संबंधित महिलेचा पती आणि सासरा हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते. आता या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रतिक्रिया दिली आहे. आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
माझा संबंध नाही -अजित पवार
या प्रकरणी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘मी फक्त लग्नाला उपस्थित होतो. माझा काही संबंध नाही. नालायक माणसे माझ्या पक्षात नको. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षातील लोकांनी चूक केली तर माझा काय संबंध आहे. फरार असलेल्या हगवणे यांना शोधण्यासाठी पोलिसांची पथके वाढवली आहे. आता कुणाच्या लग्नाला गेलो तर अशी अडचण येते. त्यामुळे कुणी लग्नाला नाही आले तर नाराज होऊ नये.’ शिवाय याबाबत पत्रकार परिषद घेणार असल्याचं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

वैष्णवीची आत्महत्या की हत्या?
वैष्णवी आणि सुशील उर्फ शशांक यांचे लव्ह मॅरेज होते. हट्टामुळे हे लग्न थाटामाटात झाले होते. या लग्नासाठी शंशाक याच्याकडून फॉर्च्यूनर गाडीचा मागणी झाली होती. तसेच सोन्याची मागणी देखील झाली होती. एक लाख 20 हजाराचे घड्याळ मागितले होते. लग्नात फॉर्च्यूनर गाडी अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आली होती. त्यावेळी अजित पवार म्हणाले होते, राजाभाऊंनी तुमच्याकडे गाडी मागितली की, तुम्ही दिली, अशी माहिती वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी दिली.
या प्रकरणात आता ही आत्महत्या की हत्या असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. त्याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे. त्यांनी पिंपरी पोलीस आयुक्तांना फोन करत वेगाने पाऊले उचलण्याची सूचना केली आहे. शिवाय वैष्णवीचे लहान मुल कुटुंबाला सुपुर्द करण्यास सांगितले आहे. वैष्णवी हगवणेचा सासरा अद्याप फरार असल्याची माहिती आहे. तर, नवरा , सासू आणि नणंद पोलिसांच्या अटकेत आहे.