बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीला ऐतिहासिक महत्व आहे. प्रामुख्याने पावसाबाबत आणि देशातील इतर परिस्थितीबाबत या ठिकाणी भाकीत केले जाते. काही प्रमाणात या आधी भाकीतं खरी ठरल्याचा अनुभव देखील आहे. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांबाबत एक महत्वाची भविष्यवाणी समोर आली आहे. यंदाचा पावसाळा नेमका कसा राहणार ते पाहू…
सुरूवातीला पाऊस ओढ देणार?
भेंडवळ घटमांडणीची 350 वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. यावर्षीच्या घटमांडणीत पावसाळ्याचा अंदाज, शेतीची स्थिती आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला अनिश्चितता असली तरी नंतर तो सर्वसाधारण राहील असे भाकित आहे. या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीशी खळबळ माजली आहे. कारण जून, जुलै या महिन्यांत पाऊस काहीशी ओढ देण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामाच्या सुरूवातीला काही पिकांसाठी ही बाब धोक्याची घंटा मानली जात आहे.

सुमारे साडेतीनशे वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या भेंडवळ घट मांडणीचे भाकित महत्वाचे मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळमध्ये घटमांडणी करण्यात आली. नुकतंच भेंडवळ घट मांडणीत यंदाचा पाऊस कसा असणार, याबद्दलचा अंदाज वर्तवण्यात आला. भेंडवळच्या घटमांडणीत शेती आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित भाकितांबरोबरच नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय घडामोडींविषयीही अंदाज वर्तवण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून हे भाकित अचूक आहेत. लोकांचा या परंपरेवर दृढ विश्वास आहे. 1 मे रोजी सूर्योदयापूर्वी भेंडवळीच्या घटमांडणीचे भाकीत मांडण्यात येते.
सारंगधर महाराज यांनी यावर्षीच्या पीकपाणी आणि देशाच्या स्थितीबद्दल महत्त्वपूर्ण अंदाज व्यक्त केले आहेत. यंदा पिकांची परिस्थिती सर्वसाधारण राहणार आहे. तसेच यावेळी चार महिने पाऊस कसा असेल याबद्दलचाही अंदाज मांडण्यात आला आहे. सुरुवातीचे दोन महिने अनिश्चित आणि काही ठिकाणी कमी-जास्त पाऊस राहील, असा अंदाज या भेंडवळीच्या घटमांडणीत वर्तवण्यात आला आहे. पण त्यानंतर पाऊस सर्वसाधारण राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जून, जुलैमधील पावसाचा तुटवडा ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये भरून निघणार का हे पाहणं महत्वाचं असेल.
नैसर्गिक आपत्ती येणार, युद्ध होणार?
दुसरीकडे देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असंही यंदा सांगण्यात आलं आहे. भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तींचा देखील सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे देशातील पशूधन मात्र चांगले जीवनमान जगले, चारापाणी मुबलक असेल असंही सांगण्यात आलंं आहे.