कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळावरून बंगलोर आणि हैदराबादसाठी थेट विमानसेवा उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे दक्षिण भारतातील प्रमुख शहरांमध्ये प्रवास करणे सोपे झाले आहे. सध्या इंडिगो कंपनीकडून बंगळुरू व हैदराबाद या दोन्ही मार्गांवर विमान सेवा आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन स्टार एअरवेजने या मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्टार एअरवेजची सेवा
कोल्हापूर एअरपोर्टवरून ‘स्टार एअरवेज’कडून बंगळुरू आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी विमानसेवा सुरु होणार आहे. यासाठी दिवस आणि वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. 15 मेपासून ही विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या स्टार एअरवेजकडून कोल्हापूर ते तिरुपती, अहमदाबाद, मुंबई या शहरांसाठी सेवा सुरु आहे. सध्या इंडिगो कंपनीकडून बंगळुरू व हैदराबाद या दोन्ही मार्गांवर विमान सेवा आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन स्टार एअरवेजने या मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

असे असेल वेळापत्रक
विमानसेवा वाढवण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. कोल्हापूर-हैदराबाद-कोल्हापूर ही विमानसेवा दर मंगळवारी आणि बुधवारी सुरू राहणार आहे. यामुळे हैदराबाद, तेलंगणा राज्य या ठिकाणी जाऊ पाहणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी स्टारचे विमान हैदराबादवरून उड्डाण करेल आणि 10 वाजून 40 मिनिटांनी कोल्हापुरात येईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण केलेले विमान सायंकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी हैदराबादमध्ये पोहोचेल. कोल्हापूर हैदराबाद हा 65 मिनिटांचा प्रवास असेल.
प्रत्येक मंगळवार, बुधवार आणि रविवार या दिवशी कोल्हापूर बंगळूरू कोल्हापूर या मार्गावर स्टार एअरवेजचे विमानसेवा असेल. कोल्हापुरातून सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी विमान उड्डाण घेईल आणि 12 वाजून 35 मिनिटांनी बंगळूरला पोहोचेल. बंगळुरू मार्गावरील विमानसेवेची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. त्याला आता यश आले आहे.
इंडिगोची सेवा सुरूच राहणार
सुरूवातीपासून इंडिगो बंगळुरू आणि हैदराबाद विमानसेवा देत आहे. स्टारच्या एंट्रीने या सेवेला कोणतीही बाधा पोहोचणार नसून ही सेवा सातत्याने सुरू राहणार आहे. तिकिटांचे दर साधारणपणे 5 हजारांच्या घरात असणार आहेत.