अभिनेत्री प्राची पिसाटनं फेसबुक चॅटचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आणि संपूर्ण मराठी इंडस्ट्री हादरली. प्राचीला फेसबुक चॅटवर दिग्गज अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्या अकाउंटवरुन काही आक्षेपार्ह्य मेसेज आले होते. सुदेश म्हशीलकर यांनी अभिनेत्री प्राची पिसाटला मेसेज केल्याच्या आरोपावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपली बाजू मांडली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
मराठी अभिनेते सुदेश म्हशिलकर यांच्या फेसबुक अकाऊंटवरून प्राचीला “तुझा नंबर पाठव ना, तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये कसली गोड दिसते आहेस…हल्ली खूपच सेXX दिसायला लागली आहेस…वाह” असा मेसेज आला होता. प्राचीने याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर प्राचीला अनेक मराठी कलाकारांनी पाठिंबा देत या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर सुदेश म्हशिलकरांनी सविस्तर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे सुदेश म्हाशिलकर यांची पोस्ट?
खरंतर मी ह्या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो. पण गेले काही दिवस जे काही सोशल मीडियावर सुरू आहे, त्यावर अनेक लोकांचे, मीडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही. म्हणून आज इथे माझं म्हणणं मुद्द्यांनुसार मांडत आहे.”
1) “हा मेसेज खरंच मीच केला का?”
तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला आहे. पण तो नेमका केव्हा? कसा गेला? कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला? याचा मला पत्ता नाही. त्याबाबतीत मी लेखी तक्रार दाखल केली आहे, ती मी इथे जोडत आहे. आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे, त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.
2) “अश्लील मेसेजेस केल्याचा आरोप”
मी इथे माझ्या फोनमधील मूळ चॅट्सचे स्क्रीनशॉट्स जोडत आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्यविनोदाच्या स्वरात लिहिलेलं असं दिसेल.
जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका आक्षेपार्ह असता, तर त्यावर प्रतिक्रिया देताना “असं का पाठवलं?” एवढं तरी कुणीही विचारलं असतं. पण इथे उलट, मेसेजचा संदर्भ तोडून, त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकांना अर्धवट माहिती देऊन अश्याप्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचं आहे.
3) “फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का?”
माझ्या फोनमध्ये ‘Prachi Pisat’ ह्या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे. मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागायची गरजच नव्हती.ज्यादिवशी पोस्ट आली त्यादिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता पण तिने घेतलाच नाही.
4) “पाच दिवस उत्तर का दिलं नाही?”
मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. माझं शूटिंग, माझं काम, आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत जातो. माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे, आणि माझी मुलंही ह्याच इंडस्ट्रीत काम करतात. या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल, याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही. हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो, कुठून सुरूवात करावी हे समजत नव्हतं.
5) “प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं?”
माझ्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहित नाही. कारण मी स्वतः कुणाला असं करायला सांगितलं नाही.
6) “बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी?”
‘सेक्सी’ म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे. ज्या माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात. त्या आजही आवर्जून आमच्याकडे येतात, आणि माझ्या पत्नीच्या हातचं जेवण प्रेमाने खातात. आपण जेव्हा एकत्र काम करत होतो तेव्हा तू सुद्धा तिच्या हातचं जेवलीयस.
या सगळ्या गोष्टींबद्दल कुणाला काही तपासायचं असेल, कुणाला काही विचारायचं असेल तर माझी अजिबात हरकत नाही.
प्रतिष्ठा ही काचेसारखी असते पारदर्शक, पण नाजूक.
कोणीतरी एक दगड फेकतो… आणि आरसा मोडतो.
आज तो क्षण मी गाठलाय… आणि तो शांतपणे पाहतोय.
वैयक्तिक पातळीवर एवढंच सांगावंसं वाटतं की — जर हे सर्व केवळ बदनामीसाठी केलं जात असेल, तर ते नक्कीच खेदजनक आहे. मी हा विषय इथे संपवत आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांचे मनःपूर्वक आभार.
अशी पोस्ट शेअर करत म्हशीलकर यांनी त्यांची बाजू मांडली आहे.