अरशद वारसी आणि बरुण सोबती यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘असुर’ या लोकप्रिय वेब सीरिजचा तिसरा सीझन आता अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. याआधीचे दोन्ही सीझन प्रचंड यशस्वी ठरले होते आणि आता मेकर्स मूळ स्टारकास्टसह तिसऱ्या सीझनसाठी कमबॅक करत आहेत. ‘असुर’मधील अरशद आणि बरुण यांचे पात्र प्रेक्षकांच्या मनावर आधीच छाप पाडून गेले आहेत.
जिओ हॉटस्टारवर परतणार ‘असुर 3’
‘न्यूज 24’च्या माहितीनुसार, ‘असुर सीझन 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जिओ हॉटस्टारने या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनसाठी अधिकृतपणे ग्रीन सिग्नल दिला आहे. आगामी भाग अधिक तीव्र, धक्कादायक आणि थरारक असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. सीझन 2 नंतर जवळपास दोन वर्षांनी चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

‘असुर 3’ ची कथा कशी असेल?
‘असुर 3’ ची कथा पूर्वीपेक्षा अधिक गूढ आणि मन हेलावून टाकणारी असेल. प्रेक्षकांना शेवटपर्यंत तणावात ठेवणारी ही कथा सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेली असेल. जिओ हॉटस्टारने या सीझनसाठी परवानगी दिल्यानंतर लवकरच शूटिंग सुरू होणार आहे.
या वर्षाच्या अखेरीस सुरू होणार शूटिंग
मिळालेल्या माहितीनुसार, ‘असुर 3’ ची शूटिंग 2025 च्या शेवटी सुरू होण्याची शक्यता आहे. सीरिजचे लेखक व निर्माते गौरव शुक्ला मागील दोन वर्षांपासून नव्या सीझनसाठी तयारी करत आहेत. प्रोडक्शन टीम 2025 च्या अखेरीस शूटिंग सुरू करून 2026 च्या शेवटी सीझन रिलीज करण्याचा विचार करत आहे.
‘असुर 3’ साठी नवीन दिग्दर्शक
‘असुर’च्या दोन्ही सीझनचे दिग्दर्शन करणारे ओनी सेन हे सध्या एका नव्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. ते ‘ऑपरेशन सफेद सागर’ या नेटफ्लिक्सवरील युद्ध आधारित मालिकेवर काम करत आहेत, त्यामुळे ‘असुर 3’ साठी नवीन दिग्दर्शक निवडला जाण्याची शक्यता आहे.
अरशद वारसीचे आगामी प्रोजेक्ट्स
अरशद वारसीच्या आगामी कामांबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच अक्षय कुमारसोबत ‘जॉली एलएलबी 3’मध्ये झळकणार आहे. तसेच, शाहरुख खानच्या ‘किंग’ या चित्रपटातही त्याचा सहभाग असणार आहे.