संत शिरोमणी गोरा कुंभार यांची आज पुण्यतिथी, जाणून घ्या

काय आहे संत गोरा कुंभार यांची कथा जाणून घ्या....

वारकरी संप्रदायात ज्येष्ठ, अधिकारी, वैराग्याचा महामेरू म्हणून ओळखले जाणारे संतकवी म्हणजे, संत गोरा कुंभार. संतमंडळात गोरोबाकाका म्हणून प्रिय असणाऱ्या या थोर संताची आज पुण्यतिथी. संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत होते. हे विठ्ठलाचे मोठे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहे.

उस्मानाबादमधील तेर गावी जन्म

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तेर या गावी  १२६७ मध्ये संत गोरा कुंभार यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव रखुमाई आणि वडिलांचे नाव माधवबुवा होते. तेर गावातील हे कुंभार घराणे धार्मिक आणि सदाचारी म्हणून परिचित होते. येथील काळेश्वर ग्रामदैवताचे ते उपासक होते.

‘गोरोबा’ नाव कसे पडले

संत गोरा कुंभार यांचे आई वडील कुंभारकाम करून आपला उदरनिर्वाह करायचे. तेर गावात माधव बुवांना संत म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली आठही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रद्धा व भक्ती होती. पण पांडुरंग साक्षात माधवबुवांच्या घरी ब्राह्मणाचे वेष घेऊन आले आणि त्यांना दुखी होण्याचं कारण विचारले. त्यावर माझ्या मुलांना मी माझ्या हाताने पुरले आहे आणि माझी आठही मुलं देवाने नेली. असे सांगितल्यावर पांडुरंगाने माधवबुवांना ज्या जागी मुलांचे मृतदेह पुरले आहे ते दाखवण्यास सांगितले आणि प्रेत बाहेर काढण्यास सांगितली. पांडुरंगाने सांगितल्या प्रमाणे त्यांनी प्रेत काढले आणि पांडुरंगाने त्या सात ही मुलांना जिवंत केले आणि स्वर्गात पाठवणी केली. नंतर त्यांनी आठव्या मुलाला देखील जिवंत केला आणि तो देखील स्वर्गाकडे जायला निघाला तेवढ्यात पांडुरंगाने त्यांना थांबविले आणि माधवबुवा आणि रखुमाईच्या हातात दिले आणि म्हणाले गोरीतून काढल्यामुळे ह्याचे नाव गोरोबा असेल.अशी आख्यायिका आहे.

 

श्री विठ्ठलाचे स्मरण सतत त्यांच्या मुखात असे. त्यांना नामस्मरणापुढे कशाचेच भान उरत नसे

एकदा त्यांची पत्‍नी पाणी आणावयास म्हणून बाहेर गेली होती. तिने त्यांना आपल्या तान्ह्या बाळावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. गोरोबाकाका उन्मनी अवस्थेत मडकी घडविण्यासाठी लागणारी माती तुडवून चिखल करीत होते. त्यांचे ते तान्हे लेकरू चिखल करताना पायाखाली तुडविले गेले, तरी त्यांना भान नव्हते. पत्‍नी पाणी घेऊन आल्यावर पाहते, तर तिचे मूल गतप्राण झालेले होते. तिने हंबरडा फोडल्यावर गोरोबाकाका शुद्धीवर आले. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. गोरोबांना वाटले आपण काय करून बसलो. अतिशय मनस्वी पश्र्चातापात ते दग्ध झाले. पण काही काळानंतर विठ्ठलाच्या कृपेने त्यांचे मूल जिवंत झाले आणि त्यांच्या पत्‍नीस परत मिळाले. त्‍यानंतर त्यांची पत्‍नीही विठ्ठलभक्त झाली.

 


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News