आधुनिक क्रिकेटमधील ‘फॅब फोर’मध्ये विराट कोहली, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ आणि जो रूट यांची नावे आहेत. या ४ दिग्गज खेळाडूंपैकी विराट कोहलीने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तर उर्वरित ३ खेळाडू अजूनही कसोटी क्रिकेट खेळत आहेत. हे सर्व खेळाडू किती काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतील, याबद्दल काहीही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या ४ खेळाडूंनंतर पुढचे फॅब ४ कोण असतील.
पुढचे फॅब-४ कोण असतील?
न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू केन विल्यमसनने अलीकडेच पुढील पिढीच्या फॅब-४ चा भाग असू शकतील अशा ४ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. क्रिकेट मंथली (ESPN Cricinfo) शी बोलताना, विल्यमसनने पुढील फॅब 4 साठी यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, हॅरी ब्रुक, कॅमेरॉन ग्रीन आणि रचिन रवींद्र यांची नावे घेतली. तो म्हणाला की, हे सर्व खेळाडू उत्कृष्ट आहेत आणि या खेळाडूंनी सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या तरुण खेळाडूंकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत आणि ते भविष्यात त्यांच्या संघासाठी मोठे मॅचविनर खेळाडू बनू शकतात.

फॅब-४ कधी सुरू झाले?
क्रिकेट जगतात फॅब ४ बद्दलची पहिली चर्चा २०१४ मध्ये झाली होती. विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, जो रूट आणि केन विल्यमसन या ४ खेळाडूंना ‘फॅब फोर’ असे नाव देण्यात आले. हे चारही फलंदाज त्या काळातील सर्वोत्तम खेळाडू होते आणि म्हणूनच त्यांना फॅब-४ चा दर्जा मिळाला. या चौघांनी वर्षानुवर्षे आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. चारही खेळाडूंनी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही स्वरूपात भरपूर धावा केल्या. पण हे सर्व खेळाडू आता त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहेत.
विराट कोहली फक्त वनडे खेळमार
विराट कोहलीने गेल्या महिन्यात (मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच वेळी, २०२४ चा टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर, त्याने टी२० लाही निरोप दिला. अशा परिस्थितीत विराट आता फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल. तर स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन आणि जो रूट अजूनही कसोटी क्रिकेट खेळत आहेत. या तिघांपैकी, विशेषतः जो रूटने गेल्या काही काळापासून कसोटीत चमकदार कामगिरी केली आहे.