युवा स्टार वैभव सूर्यवंशीने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, विमानतळवारील धावत्या भेटीत काय घडलं? पाहा

आयपीएल २०२५ मध्ये जेव्हा १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी याला राजस्थान रॉयल्सकडून पदार्पणाची संधी मिळाली, तेव्हा त्याने आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने सर्वांना प्रभावित केले.

PM Modi meets IPL sensation Vaibhav Suryavanshi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या बिहार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आज (३० मे) पटणा विमानतळावर १४ वर्षीय युवा क्रिकेटर आणि उदयोन्मुख खेळाडू वैभव सूर्यवंशी याची भेट घेतली, यावेळी वैभवचे पालकही उपस्थित होते. पीएम मोदी यांनी या भेटीचे फोटो आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत वैभवला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

वैभवला भविष्यासाठी शुभेच्छा

आयपीएल २०२५ मध्ये जेव्हा १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी याला राजस्थान रॉयल्सकडून पदार्पणाची संधी मिळाली, तेव्हा त्याने आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने सर्वांना प्रभावित केले. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैभव सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत झालेल्या भेटीचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर करत लिहिले की, “पटणा विमानतळावर युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबाशी भेट झाली. त्याच्या क्रिकेट कौशल्याची संपूर्ण देशभर प्रशंसा होत आहे. त्याच्या भविष्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.”

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने वैभव सूर्यवंशीला १ कोटी १० लाख रुपयांना आपल्या संघात सामील केले. १९ एप्रिल रोजी राजस्थान आणि लखनऊ यांच्यात झालेल्या सामन्यात वैभवने पदार्पण केले आणि आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला. त्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात फक्त ३५ चेंडूंमध्ये शतकी खेळी केली करत इतिहास रचला. वैभव आयपीएल इतिहासात सर्वात कमी चेंडूंमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.

वैभवला यंदा एकूण ७ सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने ३६ च्या सरासरीने २५२ धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २०६.५६ इतका होता आणि त्याच्या बॅटमधून १ शतक आणि १ अर्धशतकही पाहायला मिळाले. मात्र राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल २०२५ हंगाम विशेष ठरला नाही आणि त्यांचा प्रवास लीग स्टेजच्या सामन्यांतच संपला.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News