शिर्डी – शिर्डीतल्या साईबाबांच्या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक येत असतात. नवस पूर्ण झाल्यानंतर देश-विदेशातील साईभक्त कोट्यवधींचं दान मंदिराला करतात. तिरुपती बालाजी देवस्थानानंतर देशातील श्रीमंत देवस्थान अशी शिर्डीच्या साईबाबत संस्थानची ओळख आहे. अशा साईंच्या दरबारात संस्थानातील एक शिपाई कर्मचारीच चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. साईभक्तांनी मोठ्या आस्थेनं दक्षिणा पेटीत टाकलेलं दान साई संस्थानच्या एका शिपायानं चोरल्याची घटना घडलीय.
साईबाबांच्या चरणी येणाऱ्या दानात एक रुपयाच्या नाण्यापासून ते 500 च्या नोटेपर्यंत आणि अगदी परदेशी चलनही त्यात असतं. साई मंदिर आणि परिसरातील दानपेट्यांमधील ही रक्कम मंगळवार आणि शुक्रवार अशी आठवड्यातून दोनदा मोजली जाते. अधिकारी, कर्मचारी आणि शिपायांच्या उपस्थितीत ही रक्कम मोजून झाली की ती बँकेत भरणा केली जाते. पण ही रक्कम मोजण्याच्या दिवशी पैशांचं बंडल शिताफीने लपवून ते चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला.

लेखा शाखेतील शिपाई निघाला चोर
लेखा शाखेतील शिपाई बाळासाहेब गोंदकर याने साईंच्या देणगीवर डल्ला मारल्याची तक्रारच पोलिसांत दाखल झालीय. काही कर्मचाऱ्यांना दक्षिणा मोजणी हॉलमध्ये आढळलेल्या नोटांच्या बंडलामुळे संशय आला आणि बाळासाहेब गोंदकर याची चोरी उघडकीस आली.
दोन वेळा 500 रुपयांच्या नोटांची बंडलं बाहेर मंदिर परिसरात सापडल्यानं हा सगळा प्रकार उघड झाला. 16 एप्रिलला दक्षिणा मोजणी कक्षातील भिंतीजवळ काऊंटिंग मशीनमध्ये 500 रुपयांच्या 93 नोटांचं बंडल आढळलं. 25 एप्रिल रोजी मोजणी आटोपल्यानंतर काऊंटिग मशिन आणि यूपीएस मशिनच्या मध्ये 500 रुपयांच्या नोटांचं बंडल आढळलं. दक्षिणा मोजणी कक्षामध्ये सलग दोन वेळा संशयास्पद घटना वाटल्याने सीसीटीव्ही फुटेज जतन करून ते तपासण्यात आलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये लेखाशाखेतील शिपाई बाळासाहेब गोंदकर दक्षिणा मोजणीच्यावेळी चोरी करण्याच्या उद्देशाने नोटा लपवताना आढळून आले. त्यानंतर आधीचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता बाळासाहेब गोंदकर याने कुणाला कळणार नाही अशा रितीने बंडल लपवत असल्याचं समोर आलंय. दक्षिणा मोजणीचं काम करताना बंडल दुसरीकडे फेकायचा आणि ड्युटी संपल्यानंतर सिव्हील ड्रेसवर मोजणी कक्षात येऊन ही रक्कम गोंदकर चोरुन नेत असे.
किती रकमेची चोरी
बाळासाहेब गोंदकर याने 4, 10 आणि 12 एप्रिल रोजी चोरून नेलेली ही रक्कम अंदाजे सव्वा लाख ते दीड लाख रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. तर 16 आणि 25 एप्रिल रोजी 45 ते 50 हजार रुपये रक्कम दक्षिणा हॉलमध्ये लपवून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. ही रक्कम अधिक असण्याची शक्यताही आता वर्ततवण्यात येतेय.
गुन्हा नोंदवण्यापूर्वी संस्थाननं वेगळं कारण देत गोंदकर याला निलंबित केलं होतं. गुरुवारी सविस्तर अहवाल आल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. निलंबित झाल्यानंतर बाळासाहेब गोंदकर अपघातात जखमी झाल्यानंतर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अद्याप तो रुग्णालयातच असल्यानं त्याला अजून अटक करण्यात आलेली नाही.