IPL 2025 : आयपीएल २०२५ आता आपल्या अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणाऱ्या सामन्यानंतर प्लेऑफची सुरुवात होईल. २९ मे रोजी क्वालिफायर-१ म्हणून प्लेऑफचा पहिला सामना खेळला जाईल.
त्याच्यानंतर लगेचच, म्हणजे ३० मे रोजी एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. हे दोन्ही सामने चंदीगडच्या मुल्लांपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील.

मुल्लांपूरमध्ये पावसाचा धोका
मुल्लांपूर हे चंदीगढजवळच स्थित आहे. चंदीगड शहरातील मुल्लांपूर येथील क्रिकेट स्टेडियम चंदीगडपासून सुमारे १० किमी अंतरावर आहे. बीसीसीआयने कोलकाता आणि हैदराबाद येथील प्लेऑफ सामने पावसामुळे मुल्लांपूर आणि अहमदाबाद येथे हलवले होते. मात्र आता मुल्लांपूरमध्येच २९ आणि ३० मे रोजी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, २९ आणि ३० मे रोजी हरियाणा, पंजाब आणि चंदीगडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे.
पाऊस पडला तर पुढच्या फेरीत कोण जाणार?
आतापर्यंत आयपीएलमध्ये, पावसामुळे क्वालिफायर किंवा एलिमिनेटर दोन्हीही रद्द झालेले नाहीत. पण मुल्लानपूरमध्ये पावसामुळे दोन्ही सामने झाले नाहीत तर काय? क्वालिफायर आणि एलिमिनेटरमध्ये राखीव दिवस नाहीत.
प्लेऑफमध्ये सामने आयोजित करण्यासाठी अतिरिक्त २ तास दिले जातात. जर एकही चेंडू टाकण्याची शक्यता नसेल तर गट फेरीत अव्वल स्थान मिळवणारा संघ पुढील फेरीत जातो. याचा अर्थ असा की जो संघ प्रथम येईल त्याला क्वालिफायर-१ चा विजेता घोषित केले जाईल आणि तो अंतिम फेरीत जाईल. दुसऱ्या क्रमांकाचा संघ क्वालिफायर-२ मध्ये खेळेल.
अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे
एलिमिनेटरमध्येही असेच होईल. मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्या स्थानावर आहे. जर एलिमिनेटर सामना झाला नाही तर मुंबई बाहेर पडेल. तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळेल.
जर नरेंद्र मोदी स्टेडियमवरील दुसरा क्वालिफायर सामनाही पावसामुळे रद्द झाला तर दुसऱ्या क्रमांकाचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. अंतिम सामन्यात राखीव दिवस आहे. जर दोन्ही दिवशी पाऊस पडला तर टेबल टॉपरला लीगचा विजेता घोषित केले जाईल.