वॉशिंग्टन डीसी – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आगीशी खेळत आहेत, अशी पोस्ट सोशल मीडियावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरतेय. ड्रम्प यांनी पुढे हेही लिहिलं आहे की, जर ट्रम्प नसते तर आतापर्यंत रशियासोबत बरंच काही वाईट घडलं असतं. रशियाच्या नव्या हल्ल्यानं नाराज झालेले ट्रम्प रशियावर या आठवड्याच्या अखेरीस नवे निर्बंध लादण्याची शक्यता आहे.
24 मे रोजी युक्रेनवर रशियानं तीन वर्षांतील सर्वात मोठा हल्ला केला. त्यानंतर ट्रम्प हे जाहीरपणे पुतीन यांच्यावर टीका करताना दिसतायेत. रशियानं किववर 9 बॅलेस्टिक मिसाईल, 60 क्रूझ मिसाईल आणि 298 ड्रोननी हल्ला केला होता.

तिसरं महायुद्ध वाईट, रशियाची प्रतिक्रिया
ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सद्यस्थितीत सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. आपण केवळ एकच वाईट बाब मानतो आणि ती म्हणजे तिसरं महायुद्ध असं ते म्हणालेत. ट्रम्प यांना हे समजेल, असंही मेदवेदेव म्हणाले आहेत.
युक्रेन पुतीनच्या हत्येच्या प्रयत्नात, रशियाचा आरोप
युक्रेननं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं हेलिकॉप्टर पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप रशियाच्या वतीनं करण्यात आलाय. पुतीन 20 मे रोजी कुर्स्क दौऱ्यावर असताना त्यांच्या हेलिकॉप्टरवर 46 ड्रोननं हल्ला केल्याचा आरोप रशियाचे मेजर जनरल युरी डॅशकिन यांनी केलाय. हा हल्ला परतवून लावला असल्याचंही रशियाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
शस्त्रसंधीचा प्रस्ताव रशियानं नाकारलाय
युक्रेननं 30 दिवसांच्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव रशियासमोर ठेवला होता. मात्र रशियाने त्याचा स्वीकार केलेला नाही. युक्रेनला चार परिसरातून पूर्णपणे मागे हटावं लागेल, अशी भूमिका रशियानं घेतलीय. या भागात सुमारे 1.1 कोटी युक्रेनी नागरिक राहतायेत. युक्रेननं रशियाचा हा प्रस्ताव नाकारला आहे. आता रशियाच्या नव्या हल्ल्यानंतर हा संघर्ष आणखी तीव्र होईल असं मानण्यात येतंय.