‘द रेस’ अनधिकृत डान्स बारवर कारवाई, ४६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ४० महिलांची सुटका, मंत्री योगेश कदमांची माहिती

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि प्रभावी कार्यपद्धतीमुळे अशा बेकायदेशीर व अनैतिक कृत्यांवर आळा बसण्यास निश्चितच मदत होणार आहे. राज्य सरकारने हाती घेतलेली ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार आहे.

Yogesh Kadam : नवी मुंबईतील वाशी येथून अनाधिकृत डान्स बारवर सरकारने केलेल्या कारवाईबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील वाशी परिसरातील ‘द रेस’ नावाच्या अनधिकृत डान्स बारवर मंगळवारी रात्री पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्पष्ट निर्देशानुसार पोलिसांनी तत्परता दाखवून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे.

४६ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल…

ही कारवाई ही राज्य शासनाच्या अश्लीलतेवर कठोर प्रतिबंध घालण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे. समाजातील नैतिक मूल्यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पावले उचलण्यात येत आहेत. या कारवाईत ४० महिलांची सुटका करण्यात आली. याशिवाय, ६ बार वेटर यांच्यासह एकूण ४६ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार परवानगीशिवाय सुरू…

या प्रकरणात बार मालक, व्यवस्थापक आणि इतर संबंधितांवर अनधिकृत व्यवसाय, अश्लील कृत्यांना प्रोत्साहन देणे तसेच महिलांच्या प्रतिष्ठेचा भंग करणारे वर्तन याबाबत विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर बार परवानगीशिवाय रात्री १२ नंतर सुरू होता. पोलिसांनी रेड केली असता, म्युझिक सिस्टीमच्या कर्णकर्कश्श आवाजात काही महिला अत्यंत अश्लील पोशाखात ग्राहकांसमोर अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याचे निदर्शनास आले.


About Author

Astha Sutar

Other Latest News