आयपीएल 17 मे पासून पुन्हा सुरू झाली. उर्वरीत सुरू झालेल्या सामन्यांपैकी पहिला सामना बंगळुरू वि. कोलकाता पावसामुळे रद्द करण्यात आला. तर दुसरीकडे आयपीएलच्या 18 व्या मोसमात आज दोन सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. संजू सॅमसन याच्याकडे राजस्थानचं कर्णधारपद आहे. तर श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करणार आहे. पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे पंजाबसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. तर राजस्थानचं प्लेऑफमधून आधीच पॅकअप झालंय. त्यामुळे राजस्थानसाठी गमावण्यासारखं काहीच नाही. अशात राजस्थान या सामन्यात विजय मिळवून पंजाबच्या अडचणीत वाढ करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं आणि इतर संघांचं लक्ष असणार आहे.
पंजाब प्ले ऑफ्स गाठणार का?
पंजाब आणि राजस्थान या दोन्ही संघांची या सीझनमध्ये आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. याआधी 5 एप्रिलला पंजाब विरुद्ध राजस्थान आमनेसामने होते. तेव्हा राजस्थानने पंजाबला 50 धावांच्या फरकाने पराभूत केलं होतं. त्यामुळे आता पंजाबकडे या पराभवाची परतफेड करण्यासह प्लेऑफमध्ये पोहचण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे पंजाब यात यशस्वी ठरते की राजस्थान पुन्हा विजयी होते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळे आज पंजाबला प्ले ऑफ्सचं तिकीट पक्कं करण्याची नामी संधी असणार आहे.

गुजरात की दिल्ली कोण जिंकणार?
आजचा दुसरा महत्वाचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगतदार सामना होणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. दिल्लीकडे या सामन्यात पराभवाची परतफेड करण्याचीही संधी आहे. प्लेऑफच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे. गुजरातकडे हा सामना जिंकून प्लेऑफमधील प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे. तर दिल्लीला आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना कोणत्याही स्थिती जिंकावा लागणार आहे. अशात या सामन्यात चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्सला तीन पैकी तीन सामने जिंकावे लागतील. तर सरळ मार्गी प्लेऑफ गाठेल. पण या सामन्यात पराभव झाला तर मात्र गणित जर तर वर येईल.