भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोला EOS-09 हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात अपयश आले आहे. तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा उपग्रह प्रक्षेपित होऊ शकला नाही. पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी हा उपग्रह अवकाशात पाठवण्यात येत होता. यामुळे इस्त्रोचे महत्त्वाचे मिशन फसले. 101 व्या मिशनमध्ये इस्त्रोला अपयश आले. असे असले तरी इस्त्रोने आम्ही पुन्हा येऊ असा दुर्दम्य आत्मविश्वास व्यक्त केला आहे. नेमकं हे मिशन काय होतं, काय तांत्रिक अडचणी आले ते सविस्तर समजून घेऊ…
तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक अडचण
पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी इस्त्रोने एक उपग्रह पाठवला होता. हा उपग्रह घेऊन जात असलेले रॉकेट दुसऱ्या टप्प्यापर्यंत सामान्यपणे कार्यरत होते. तिसऱ्या टप्प्यात नेमकी तांत्रिक अडचण आली. निर्धारीत कक्षेपर्यंत उपग्रह पोहचवण्यात रॉकेटला जमले नाही. या मोहिमेला अपयश आल्याने 101 वे मिशन अर्धवट राहिले. EOS-09 हा उपग्रह पृथ्वीच्या आणि सूर्याच्या समकालिक कक्षेत (SSPO) ठेवले जाणार होते. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अचूक आणि नियमित डेटा मिळावा यासाठी रिमोट सेन्सिंग डेटा प्रदान करणे त्याचा उद्देश होता.

याबाबत माहिती देताना, इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले की, ‘तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही मोहीम पूर्ण होऊ शकली नाही. आता याबाबत संपूर्ण विश्लेषण केले जाईल आणि त्यानंतर याबाबत सविस्तरपणे माहिती सांगितली जाईल. दरम्यान, आज सकाळी 5.59 वाजता इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C61 रॉकेटद्वारे EOS-09 लाँच करण्यात आले होते.
काय होणार होता मिशनचा उपयोग?
ईओएस 09 हा इस्रोचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह होता, हा उपग्रह C-बँड सिंथेटिक ऍपरचर रडार (SAR) ने सुसज्जित होता, ज्यामुळे तो सर्व हवामान आणि दिवसा-रात्री पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा घेऊ शकत होता. याचा उपयोग कृषी, वन, जलस्रोत, आपत्ती व्यवस्थापन, शहरी नियोजन आणि राष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण होता. उदाहरणार्थ, हा उपग्रह शेतकऱ्यांना पिकांच्या आरोग्याचे निरीक्षण करण्यास, आपत्तींचे वेगाने मूल्यांकन करण्यास आणि सीमावर्ती भागांमध्ये निगराणी करण्यास मदत करू शकत होता. मात्र, या मिशनमध्ये तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक अडचणी आल्यामुळे उपग्रह यथास्थित कक्षेत स्थापित होऊ शकला नाही. इस्रोने या अयशस्वीतेची तपासणी सुरू केली असून, भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
Today 101st launch was attempted, PSLV-C61 performance was normal till 2nd stage. Due to an observation in 3rd stage, the mission could not be accomplished.
— ISRO (@isro) May 18, 2025