भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची मालिका 20 जूनपासून लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर सुरू होत आहे. मात्र मालिकेच्या सुरुवातीआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. तब्बल 8 वर्षांनंतर संघात पुनरागमन करणारा आणि शानदार फॉर्ममध्ये असलेला करुण नायर दुखापतग्रस्त झाला आहे. सराव सामन्यांत 259 धावा करून चर्चेत आलेल्या नायरला पिंढरीला चेंडू लागून ही दुखापत झाली आहे.
नेटमध्ये प्रसिद्ध कृष्णाचा बॉल लागून दुखापत

करुण नायर नेटमध्ये सराव करत असताना प्रसिद्ध कृष्णाचा एक चेंडू त्याच्या पिंढरीला लागला. त्यामुळे सध्या त्याची प्लेइंग इलेव्हनमधील उपलब्धता धोक्यात आली आहे. पहिल्या कसोटीत तो खेळू शकेल का, यावर संशय आहे.
बीसीसीआयकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा नाही
करुण नायरच्या दुखापतीबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. तो लीड्स कसोटीपूर्वी तंदुरुस्त होऊ शकेल का, यावरही अजून काही निश्चित नाही. जर त्याची दुखापत गंभीर ठरली, तर ती संघासाठी मोठी चिंता ठरू शकते.
नायरच्या जागी अभिमन्यू ईश्वरन?
जर नायर तंदुरुस्त राहिला नाही, तर त्याच्या जागी टीम इंडियाकडून दुसऱ्या पर्यायाची निवड होऊ शकते. यासाठी अभिमन्यू ईश्वरनचे नाव पुढे येत आहे. ईश्वरनने इंडिया ए संघ आणि घरगुती क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. अंतिम निर्णय टेस्टच्या सकाळी किंवा टॉसपूर्वी घेतला जाऊ शकतो.
इंग्लंडने घोषित केली प्लेइंग XI
इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठी आपली अंतिम 11 जाहीर केली आहे. मात्र भारताची प्लेइंग XI अद्याप निश्चित झालेली नाही.
इंग्लंडची प्लेइंग XI
बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडेन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर
भारताचा कसोटी संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टिरक्षक), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.