भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्स येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. रविवारी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एक मनोरंजक दृश्य पाहायला मिळाले. भारतीय वंशाचा खेळाडू यश वागडिया इंग्लंडकडून क्षेत्ररक्षण करताना दिसला. तो बेन स्टोक्सच्या जागी क्षेत्ररक्षण करत होता. विशेष म्हणजे, वागडिया हा इंग्लंड संघाचा भागही नव्हता.
इंग्लंडने तिसऱ्या दिवशीही आपला पहिला डाव सुरू केला. त्यानंतर दिवसाची पहिली विकेट शतकवीर ऑली पोप (१०६) च्या रूपात पडली. यानंतर हॅरी ब्रुकने शानदार खेळी केली, पण त्याचे शतक एका धावेनं हुकले. त्याला ९९ धावांवर प्रसिद्ध कृष्णाने बाद केले.
इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर संपला आणि पहिल्या डावाच्या आधारे भारताने ६ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताने त्यांचा दुसरा डाव सुरू केला आणि यशस्वी (१६) च्या रूपात १६ धावांवर पहिली विकेट गमावली. क्षेत्ररक्षणादरम्यान, जेव्हा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स मैदानाबाहेर गेला, तेव्हा त्याच्या जागी यश वागडिया क्षेत्ररक्षणाला आला, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले कारण तो संघाचा भागही नव्हता.

कोण आहे क्रिकेटपटू यश वगाडिया?
७ मे २००४ रोजी जन्मलेला यश वगडिया इंग्लंडमधील यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळतो. त्याचा जन्मही इंग्लंडमध्ये झाला, तो मूळचा गुजरातचा आहे. पण त्याच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे. यश हा उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि तो ऑफ-स्पिन देखील गोलंदाजी करतो. त्याने यॉर्कशायर क्लबच्या अंडर-१८ संघाचे नेतृत्व केले आहे, २ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि तो इंग्लंडमध्ये एक उदयोन्मुख स्टार आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात क्षेत्ररक्षण करण्याची त्याची ही पहिलीच वेळ नाहीये, तर त्याने यापूर्वीही असे केले आहे. तथापि, त्याने अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही.
फिल्डिंगसाठी तो मैदानात का उतरला?
तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स बाहेर गेला, तेव्हा यश वागडियाने त्याच्या जागी क्षेत्ररक्षण केले, जरी इंग्लंडमध्ये हे सामान्य आहे. काउंटी क्लबमधील काही क्रिकेटपटूंना पर्यायी खेळाडू म्हणून संघात समाविष्ट केले आहे. ते संघाचा भाग असो वा नसो. यश हा त्यापैकी एक आहे.