आयपीएलमध्ये गुजरातची विजयी घोडदौड कायम, सनरायजर्सची धुळधाण

आयपीएल 2025 चा हंगाम रंगतदार वळणावर आला आहे. रविवारी गुजरात आणि हैदराबादच्या संघांत सामना झाला, यामध्ये गुजरात टायटन्सने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली.

हैदराबाद: 2025 चा आयपीएल हंगाम आता रंगतदार वळणावर पोहोचला आहे. हैदराबादमध्ये रविवारी गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांमध्ये सामना पार पडला. यामध्ये गुजरात टायटन्सने 7 विकेट्स राखून हैदराबादच्या संघावर विजय मिळवला. सनरायजर्सने समोर ठेवलेले अवघ्या 153 धावांचे लक्ष्य गुजरात टायटन्सने अगदी सहजरीत्या गाठले. एकीकडे गुजरातची विजयी घोडदौड कायम असली तरी सनरायजर्स हैदराबाद संघाचा हा सलग चौथा पराभव ठरला.

सांघिक कामगिरीमुळे विजय:

सुरूवातीला नाणेफेक जिंकत खेळपट्टीची स्थिती लक्षात घेत गुजरातने गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या षटकात मोहम्मद सिराजने ट्रेविस हेडला बाद केल्याने सनरायजर्सला धक्का बसला. पुढे सिराजने अभिषेक शर्माला तात्काळ तंबूत धाडलं, अभिषेकला अवघ्या 18 धावा करता आल्या. काही वेळात ईशान किशनही बाद झाला. प्रसिध कृष्णाने त्याला बाद केलं. काही काळ हेनरिच क्लासन आणि नितीश रेड्डी यांनी 50 धावांची भागीदारी करत काळी काळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला. साई किशोरने क्लासनला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. लागोपाठ नितीश रेड्डीला माघारी धाडत हैदराबादला अडचणीत आणलं. सनरायजर्सचा कर्णधार पॅट कमिन्सही काही विशेष करू शकला नाही, मोहम्मद सिराज 4 तर साई किशोर , प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या.

धावसंख्येचा यशस्वी पाठलाग:

गोलंदाजांच्या चोख कामगिरीमुळे गुजरातची वाट सोपी झाली होती. 153 धावांचा पाठलाग करताना सुरूवातीलाच साई सुदर्शन मोहम्मद शमीची शिकार ठरला. पॅट कमिन्सने जोस बटलरला बाद केलं. पण, टायटन्सने सामन्यावरची पकड सुटू दिली नाही. 16/2 अशी अवस्था असताना शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदरने संघाला सावरलं.

शुभनम गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. या भागीदारीने गुजरातच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. गुजरातसाठी पदार्पणातच वॉशिंग्टनने 49 धावांची सुरेख खेळी साकारली. शमीच्या गोलंदाजीवर अनिकेत वर्माने सुरेख झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. कर्णधार शुभमनने सूत्रधाराची भूमिका निभावत संयमी अर्धशतकी खेळी साकारली. गिलच्या 61 धावांच्या जोरदार गुजरातने ध्येय गाठले, आणि 7 गडी राखून सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवला.


About Author

Rohit Shinde

Other Latest News