शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदार गेल्या काही दिवसांपासून चांगलेच गोत्यात येताना दिसत आहेत. आता मंत्री संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ राजकी. वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. शिरसाट यांच्या हातात पैशांची बॅग असलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत दोन बॅगा दिसत आहेत. त्यापैकी एका बॅगेत नोटांची बंडलं असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला. हा व्हिडीओ राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरूनही ट्विट केला.
हातातील बॅगेत कपडे, शिरसाटांचे स्पष्टीकरण
दरम्यान, हा व्हिडीओ आपल्याच बेडरूममधला असल्याचं संजय शिरसाटांनी मान्य केलं. पण पैशांची बॅग आपली असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. प्रवास करून आल्यानंतरची ती कपड्यांची बॅग असल्याचं स्पष्टीकरण शिरसाटांनी दिलं. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांचा पाय रोजच्या रोज खोलात जात असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. मुलगा सिद्धांतचे विवाहित महिलेसोबतचे संबंध, नंतर हॉटेल विट्सच्या लिलावातून त्यांना बाहेर पडावं लागलं. त्यानंतर त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली. आता बेडरुममधील पैशांच्या बॅगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

संजय शिरसाटांचा पाय आणखी खोलात?
अलीकडे संजय शिरसाटांवरील आरोप वाढताना दिसत आहेत. यामुळे संजय शिरसाटांचा पाय चांगलाच खोलात जाताना दिसत आहे. संभाजीनगरातील वीट्स हॉटेलच्या खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला. मुळात हॉटेलची किंमत 100 कोटी पेक्षा जास्त असताना शिरसाटांसाठी लिलावात किंमत कमी दाखवल्याचा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोप केला. कंपनी लिलावात सहभागी होण्यास पत्र नसल्याचाही दावा त्यांनी केला होता. या प्रकरणात अलीकडेच शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस आली होती.
छत्रपती संभाजीनगर शहरालगत वर्ग 2 ची जमीन नियमबाह्य खरेदी केल्याचा आरोप संजय शिरसाटांवर आहे. कोट्यवधीची जमीन कवडीमोल किमतीत घेतल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप आहे. मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले. सिद्धांतने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला. नंतर त्या महिलेने ते आरोप मागे घेतले. हे आमचं पर्सनल मॅटर असल्याचं तिने स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळे या ना त्या कारणामुळे मंत्री संजय शिरसाटांचा पाय दिवसेंदिवस खोलात जाताना दिसत आहे.