मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक; आढावा घेत महिनाभरात अंतिम निर्णय?

मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत राज्यभरातील आढावा घेतला जाईल, आणि महिनाभरात निर्णय होऊ शकतो.

ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. त्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत. मात्र स्थानिक पातळीवर युती, आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिल्या. स्थानिक पातळीवर कुठे आघाडी, युती करायची याचा निर्णय पक्ष घेईल.

मनसेसोबत युतीसाठी फिल्डींग

राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदेंमध्ये रस्सीखेच असल्याचं चित्र आहे. मनपात आकड्यांचं गणित जुळवण्यासाठी उद्धवना राज महत्त्वाचे वाटतात. तर आपली विश्वासार्हता वाढवण्यासाठी शिंदेंना हवा ठाकरे ब्रँड. त्यामुळे दोघांमध्येही राज ठाकरे सोबत यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहे. ठाकरे आणि शिंदेंमधला संघर्ष   आमदार, खासदार, नगरसेवक, पक्ष, चिन्ह यानंतर आता महापालिकेच्या सत्तेसाठी राज ठाकरेंना आपल्या गोटात ओढण्यापर्यंत पोहोचला आहे.

सध्याची अवस्था बघता मुंबई महापालिकेत आकड्यांचं गणित जुळवण्यासाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरे हवे आहेत. तर ठाकरे आपल्यासोबत आहेत, हे दाखवत मराठी मतदारांमध्ये आपली विश्वासार्हता वाढवण्यासाठी शिंदेंनाही राज ठाकरे सोबत हवे आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे टाळी कुणाला देणार, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महिनाभरात मनसेशी युतीबाबत निर्णय -ठाकरे

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख नेत्यांची बैठक  घेतली. राज्यभरात स्थानिक पातळीवर युती, आघाडी करण्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. जर युती, आघाडी झाली नाही तर सर्व जागांवर पक्ष म्हणून लढण्यास तयार राहण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. महिन्याभरात हा अहवाल जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख यांनी द्यायचा आहे.

त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार की नाही, याचा निर्णय येत्या महिनाभरात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. शिवाय भाजप आणि शिंदेंची शिवसेना देखील मनसेसोबत युतीसाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News