कर्जत : अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ चोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बैठकीसाठी निमंत्रण दिले होते. आज (मंगळवार) ही बैठक होत असताना राम शिंदेचे विरोधक आणि कर्जत जामखेडेचे आमदार रोहित पवार यांनी या बैठकीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कॅबिनेट बैठकीच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ चोंडी या पुण्यस्थळी आलेल्या सर्व मंत्रिमंडळाचं कर्जत-जामखेडकरांच्यावतीने मनःपूर्वक स्वागत, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, संपूर्ण कर्जत-जामखेड मतदारसंघाचे या कॅबिनेटकडं आतुरतेने डोळे लागलेत.

मतदारसंघातील प्रश्न सोडला
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीत होत असलेल्या कॅबिनेट मिटीगंमध्ये माझ्या मतदारसंघातील शेती आणि पिण्याचं पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य सोयी आणि इतर नागरी सुविधा, अध्यात्मिक क्षेत्राचा विकास, रोजगार आणि इतर प्रलंबित विकास कामांबाबत आतापर्यंत केलेला पाठपुरावा लक्षात घेऊन कृपया हे प्रश्न मार्गी लावावेत, अशी विनंती देखील रोहित पवार यांनी केली आहे.
…अन्यथा ही बैठक केवळ औपचारिकता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी रोजगार, पाणी, अध्यात्मिक विकास यासाठी खूप मोठं कार्य केलं असून त्यांचा हाच आदर्श घेऊन राज्यातही त्यांच्या नावाने या विषयांवर विविध योजना आखून त्या राबवण्याची गरज आहे. त्याही आज जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.. आजच्या कॅबिनेट बैठकीत सरकारने याबाबत ठोस असे निर्णय घेतले तरच या कॅबिनेट बैठकीच्या कल्पनेला चार चाँद लागतील, अन्यथा ही बैठक केवळ औपचारिकता ठरेल, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.