चौंडी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी 42 मंत्री आणि त्यांचा स्टाफ उपस्थित असणार आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात प्रथमच मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने या बैठकीला वेगळे महत्त्व आहे. ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम असल्याने या बैठकीला त्याचीही पार्श्वभूमी आहे. चौंडी विकास प्रकल्पासोबत विशेषतः ग्रामीण भागात बैठक होत असल्याने ग्रामीण महाराष्ट्रासाठी वेगळे काही निर्णय होतात का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची आठवण म्हणून, राज्य सरकारने त्यांच्या जन्मगावी असलेल्या चौंडी गावाच्या विकासासाठी योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या अंतर्गत चौंडीत स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे त्या गावाचा विकास होईल आणि त्यांच्या कार्याची आठवण कायम राहील.

धनगर आरक्षणावर चर्चा होणार?
आजच्या या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने सुरू होती आणि आजही तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर, निवृत्त पोलीस अधिकारी मधोजी शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठींबा दिला असून, आरक्षणाच्या प्रश्नात न्याय मिळवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. अशा परिस्थितीत आज चौंडीत धनगर आरक्षणावर काही मंथन होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आणखी काय विशेष?
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या आग्रहावरून अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. या गावात विशेष सुविधा उपलब्ध नसल्या तरी स्थानिक प्रशासनाने बैठकीसाठी सारी तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देणाऱ्या धनगर समाजाला खुश करण्याचा फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे. बैठकीत नाशिक कुंभमेळा प्राधिकरण, अहिल्याबाई यांच्यावर सर्व भाषांत चित्रपट, जिल्ह्यात वैद्याकीय महाविद्यालय असे काही निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे अवघ्या राज्याची नजर असणार आहे.