सायकलवरून प्रवास…पक्ष वाढवला; भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे भावनिक पत्र

भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहलं आहे. या पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपावण्यात आली आहे. तर मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे भावनिक पत्र समोर येत आहे. या पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कवि ना. धो. महानोरांच्या कवितेचा आशय देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही चुका झाल्या असल्यास माफी करावी असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. सर्व पक्ष श्रेष्ठींचे ही बावनकुळेंनी या पत्रामधून आभार मानले आहेत.

बावनकुळेंच्या पत्रात नेमके काय?

बावनकुळेंची कारकीर्द प्रेरणादायी

‘साधारण 35 वर्षांपूर्वी कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्याच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भिंती रंगवणे, पत्रके वाटणे, गावोगाव कधी सायकलवर, कधी मोटरसायकलवर, तर पायीच प्रवास करणे इथपासून सुरू झालेला माझा प्रवास भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत येऊन पोहोचला; हे माझ्यासाठीच अविश्वसनीय आहे. खरोखरच मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, कधीतरी भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून आपण काम करू. सामान्यमधल्या असामान्य शक्तींना जागृत करणे हीच तर आपल्या पक्षाची किमया आहे.’ पत्रातील या आशयातून चंद्रशेखर बावनकुळेंची प्रेरणादायी वाटचाल दिसून येते.

बावकुळेंनी का मागितली माफी?

पत्राच्या शेवटी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की, “राष्ट्रप्रथम, मग पक्ष आणि मग स्वतः” हे ब्रीद उराशी बाळगून मी भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मागील तीन दशकांपासून काम करतो आहे. मी विश्वास देतो की, आई जगदंबेच्या आशीर्वादाने माझ्या जीवात जीव असेपर्यंत याच प्रामाणिकतेने काम करत राहीन. आपल्या सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार ! अध्यक्ष म्हणून काम करीत असताना अनवधानाने माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, कुणाला रागावलो असेल तर मी आपणा सर्वांची मनापासून माफी मागतो.आपला लोभ असाच कायम असावा, ही विनंती.’ मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News