आमदार निवास कॅन्टिनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्यामुळे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तेथील व्यवस्थापकाला मारहाण केली होती. त्यानंतर आता गायकवाड यांच्यावर मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. निकृष्ट जेवणाचा जाब विचारण्यासाठी संजय गायकवाडांनी व्यवस्थापकाला आणि कॅन्टिन चालकाला धारेवर धरले आणि सर्वांसमोर मारहाणही केली. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल देखील झाला होता.
संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल
कॅन्टिन चालकावर कारवाई झाल्यानंतर आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. मारहाणीप्रकरणी आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्टिनमध्ये घडलेल्या मारहाणीप्रकरणी आमदार संजय गायकवाड आणि आणखी एका व्यक्तीच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्याची माहिती पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना कळवली जाणार आहे.

संजय गायकवाडांवर कारवाई होणार?
गायकवाडांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. कलम ३५२, ११५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संजय गायकवाड यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. “कुणी सभागृहात मुद्दा उपस्थित केला, तर मुख्यमंत्र्यांना विधानसभेच्या नियमाप्रमाणे बोलावं लागतं . त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं, आम्ही काय फार मोठे काम केले नाही, की ज्यामुळे सरकार अडचणीत येईल. अशा अदखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना तक्रारदार होता येत नाही. विरोधकांच्या समाधानासाठी मुख्यमंत्र्यांनी ते करायला सांगितलं असेल, मला पश्चाताप नाही. शिंदे साहेब मला फोनवर बोलले, राग कंट्रोल करण्याचा सल्ला मला दिला” असे संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तशी माहिती समोर येत आहे. कॅन्टीन चालकाचा परवाना रद्द झाला असून आता संजय गायकवाड यांच्यावर काही कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.