पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आपले काका शरद पवार यांची साथ सोडत ते महायुती सरकारमध्ये सामील झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. शरद पवारांना सोडून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ का दिली याचे कारण अजित पवारांनी जाहीर सभेतून सांगितले आहे.
पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची नियुक्ती विधानसभेच्या उपाध्यक्षपदी झाल्यामुळे आयोजित केलेल्या जाहीर कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, आम्ही निर्णय घेतला. शरद पवारसाहेबांना आम्ही कालही दैवत मानत होतो आजही दैवत मानतो. मात्र, देशाला नरेंद्र मोदीसाहेबांसारखा मजबूत नेता मिळाल्याने आम्ही त्यांच्या मागे ठाम उभं राहण्याचा निर्णय घेतला. ते जगामध्ये देशाचा मानसन्मान वाढवत आहेत त्यांना पाठबळ देणे महत्त्वाचे आहे.

अजित पवार म्हणाले, आम्ही विकासाचे राजकारण करतो. कुणाचे वैयक्तिक फायद्या तोटासाठी काम करत नाही. गेली ३० वर्ष मी राजकारणात आहे मात्र कधीही स्वार्थासाठी काम केले नाही. कुणीही सांगावं की अजित पवार स्वार्थी माणूस आहे. आम्ही स्वार्थ पाहाणारी माणसं नाही. पिंपरीत आपल्याकडे पूर्वी एकच मतदारसंघ होता आता तीन आहेत पुढील वेळी तो पाच देखील होती.
अण्णा लवकर उठा कामाला लागा…
अण्णा हा मूर्ती लहान पण किर्ती महान असणार माणूस आहे. मी माझ्या मुलाला सांगतो जेवढे महत्त्वाचे पद तेवढी कष्ट जास्त. त्यामुळे अण्णा आता लवकर उठायची सवय लावा. लोकांना भेटा. सकाळीच कामाला लागा. लोकांना वेळ द्या, असा सल्ला देखील अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांना दिला.
दोन्ही बाजुला राहू नका
अजित पवार म्हणाले सारखे इकडे तिकडे करणाऱ्यांना कोणीही विचारत नाही. त्यामुळे एका जागी ठाम राहा. अण्णा बनसोडे एका जागी राहिला त्याला पद मिळाले. सारखे तळ्यात मळ्यात केल्याने कोणी पद देत नाही आणि कोणी विचारतही नाही. त्यामुळे निर्णय घ्या आणि एका जागेवर ठाम राहा, असा सल्ला देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.
माझ्या मागे अजितदादा…
नागरी सत्काराला उत्तर देताना अण्णा बनसोडे म्हणाले, राजकारण पुढे जाण्यासाठी गाॅड फायदची आवश्यकता असते. माझे गाॅड फायद अजितदादा आहेत. त्यांनी मला नेहमीच पाठबळ दिले आणि पुढे जाण्याची संधी दिली. त्यांनी दिलेल्या संधी मुळेच मी राजकारणात टिकू शकलो, असे देखील बनसोडे म्हणाले.