मध्य-पूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षाला आता वेगळे वळण मिळाले आहे. इस्रायलची बाजू घेत अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणुतळांवर हल्ले केले. त्यानंतर आता इराण चांगलाच चवताळला असून इस्रायलवर हल्ले सुरू करण्यात आले आहेत. शिवाय यावेळी अमेरिकन नागरिकांना देखील धोका संभवतो. कारण इराणकडून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला
इस्रायलची राजधानी असलेल्या जेरुसलेम आणि तेल अविव या दोन शहरांवर इराणने हल्ला चढवला आहे. इस्रायली लष्कराच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी इराणने जेरुसलेम आणि तेल अविव या शहरांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यापैकी अनेक क्षेपणास्त्रे इस्रायलने रोखली आहेत. मात्र, इराणी माध्यमांच्या रिपोर्टनुसार, इराणने डागलेली दहा क्षेपणास्त्रं इस्रायलमध्ये कोसळली आहेत. इराणकडून इस्रायलच्या दिशेने एकूण 30 क्षेपणास्त्रं डागण्यात आली. ही आंतरखंडीय क्षेपणास्त्रे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इराणच्या या हल्ल्यात इस्रायलचे किती नुकसान झाले आहे, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवाय यावेळी अमेरिकन नागरिक रडावर आहेत.

इराणचा अमेरिका-इस्रायलला इशारा
अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे तिन्ही आण्विक तळ उद्ध्वस्त झाले आहेत. यानंतर इराण प्रचंड संतापला आहे. इराणने त्यांच्या सरकारी वृत्तवाहिनीवरुन अमेरिकेला इशारा दिला आहे. ‘युद्ध तुम्ही सुरु केलं आहे, शेवट आम्ही करु. आता प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आमचं लक्ष्य असेल’, अशी धमकी इराणने दिली आहे. त्यामुळे आता मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. या सगळ्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि भारतावर विपरीत पडसाद होण्याची दाट शक्यता आहे. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
इराणच्या राष्ट्र प्रमुखांना इस्रायलची भीती?
गेल्या आठ दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांचे युद्ध सुरु आहे. इस्रायली लष्कराकडून सातत्याने इराणी अणुशास्त्रज्ञ आणि इराणी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारले जात आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. इस्रायलकडून अयातुल्ला खामेनी यांची हत्या करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे खामेनी यांनी त्यांना काही झाल्यास आपले तीन उत्तराधिकारी निवडले आहेत. त्यामुळे आता मध्य-पूर्वेतील परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.