UP Duty Allowance Hike 2025 : उत्तर प्रदेशातील हजारो प्रांतीय रक्षक दल म्हणजेच पीआरडीच्या सैनिकांसाठी एक चांगली बातमी आहे. राज्याच्या योगी आदित्यनाथ सरकारने पीआरडीच्या सैनिकांचा ड्युटी भत्ता 350 रुपयांवरून 500 रुपये प्रतिदिन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यावर 75 कोटी 87 लाख 50 हजार रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. मात्र या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील 34 हजार प्रांतीय रक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल.
मंगळवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत 15 प्रस्तांवांपैकी 13 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. ज्यात पीआरडी सैनिकांना ड्यूटी भत्त्यात 105 रुपये प्रतिदिन वाढ करण्यात आली आहे. नवे दर 1 एप्रिल 2025 पासून लागू झालेत. यापूर्वी 34,092 पीआरडी स्वयंसेवकांना लाभ मिळाला होता. पीआरडी स्वयंसेवकांच्या 30 दिवसांच्या हजेरीच्या आधारावर ड्यूटी भत्त्यात 3150 रुपये प्रतिमहिना वृद्धी होईल.

उत्तर प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांचं पेन्शन वाढणार?
केंद्राकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा डीए वाढवल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील पेन्शनधारकांचा दोन टक्के महागाई भत्ता वाढू शकतो. मात्र अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र यामुळे 12 लाख कर्मचारी आणि 16 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होईल.
बिहारमधील मंत्री-आमदारांच्या वेतन भत्त्यात वाढ
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार सरकारने राज्य मंत्री आणि उपमंत्र्यांचा मासिक वेतन 50 हजारांवरुन 65 हजारांपर्यंत वाढवला आहे. यानुसार प्रादेशिक भत्ता 55 हजारांवरुन 70 हजार करण्यात आला आहे.
दैनिक भत्ता 3 हजारांवरुन 3,500 करण्यात आला आहे. राज्य मंत्र्यांसाठी आतिथ्य भत्ता 24 हजारांवरुन 29,500 आणि उपमंत्र्यांसाठी 23,500 वरुन 29,000 झाला आहे. याशिवाय राज्यातील मंत्री आणि उपमंत्र्यांना सरकारी कामासाठी प्रतिकिमी 15 रुपयांऐवजी 25 रुपये मिळतील.