नवी दिल्ली– मुंबई 26-11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात यश आलं असलं तरी सध्या त्याच्यावर तपास यंत्रणा बारीक लक्ष ठेवून आहेत. दिल्लीतील एनआयएच्या हेड क्वार्टरमध्ये तहव्वू राणावर सुसाईड वॉच ठेवण्यात येतोय. विशेष कोर्टानं राणाच्या चौकशीसाठी त्याला 18 दिवसांची एनआयए कोठडी दिलेली आहे.
अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या तहव्वूर राणावर एनआयएच्या मुख्यालयात 24 तास सुरक्षा कर्मचारी आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येतेय. लोधी रोडवर एनआयएच्या मुख्यालयात ग्राऊंड फ्लोअरवर 14 बाय 14 च्या सेलमध्ये राणाला ठेवण्यात आलंय. त्याच्याकडे सॉफ्ट पिन असणारं एकमेव पेन आहे, त्याने आत्महत्येचा प्रयत्न करु नये, यासाठी यंत्रणा अलर्ट आहेत.

तहव्वूर राणाला आता चौकशीसाठी कुठे नेणार, याची उत्सुकता आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय एनआयए करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. मुंबई पोलीस राणाच्या चौकशीत केंद्र सरकार आणि एनआयएला पूर्ण सहकार्य करेल असंही फडणवीस म्हणालेत. मुंबईच्या गुन्हेगाराला भारतात आणल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले आहेत.
दहशतवादी हल्ल्याचा होता मोठा कट
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे कोणता मोठा कट होता, हे जाणून घेण्याचा एनआयएचे अधिकारी प्रयत्न करतायेत. राणाने केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरात इतर ठिकाणीही हल्ले घडवण्याचा कट रचला होता, असा युक्तिवाद एनआयएच्या वतीनं करण्यात आलाय. हा हल्ला घडवण्यामागे आयएसआयसह भारतातील स्लीपर सेल, राणाशी संबंधित व्यक्ती, डेव्हिड हेडली यांचा कितपत सहभाग होता, याची चौकशी करण्यात येणार आहे.
मुंबईकरांना अद्दल घडायलाच हवी होती- राणा
26-11 हल्ल्याचा मूत्रधार डेव्हिड हेडली मुंबईत आला असताना तो सातत्यानं राणाच्या संपर्कात होता. दोघांनी एकमेकांना 230 हून अधिक कॉल्स केल्याची माहितीही समोर आलीय. राणा हा मेजर इक्बाल नावाच्या आणखी एका व्यक्तीच्याही संपर्कात होता. 2008 साली राणाही मुंबईत आला होता, त्यावेळी तो पवईत मुक्कामी होता. मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर, मुंबईकरांना अद्दल घडायलाच हवी होती, असं वक्तव्ही राणानी केल्याची माहिती समोर आली आहे.
कोण आहे तहव्वूर राणा?
तहव्वूर राणा हा 64 वर्षांचा असून मुंबईवर झालेल्या 26-11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. राणा हा पाकिस्तानचा मूळ नागरिक असून त्याने नंतर कॅनडाचे नागरिकत्व पत्करले. त्याने काही वर्ष पाकिस्तानी सैन्यातही डॉक्टर म्हणून काम केल्याची माहिती आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडली याचा निकटवर्तीय अशीही राणाची ओळख आहे. हेडलीनं भारतात येण्यापूर्वी मुंबईवरील हल्ल्याची माहिती राणाला पुरवली होती. या कटात पाकिस्तानातील काही जणांचा सहभाग असल्याचा दावाही एनआयएनं कोर्टात केलाय.