सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या अन्यथा…, सुजात आंबेडकरांचा इशारा

सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढलेला परभणी ते मुंबई लाँग मार्च काही दलालांच्या अर्धवट नेतृत्वामुळे अपयशी ठरला, असे सुजात आंबेडकर यांनी म्हटले.

परभणी : पोलिस मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज (शुक्रवारी) वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात भव्य शांतता मार्च निघाला. या शांतता मार्चदरम्यान सुजात आंबेडकर यांनी प्रशासनावर आणि पोलिसांवर थेट आरोप केले असून, शांततेचा आजचा हा शेवटचा मार्च आहे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

सुजात आंबेडकर म्हणाले, रमाबाई आंबेडकर नगरातील पुतळा विटंबनेप्रमाणेच परभणीमध्ये जे काही घडले, ते आधीच ठरवलेले होते. लोक रस्त्यावर येणार हे माहीत असूनही पोलिसांनी शांतता राखण्याऐवजी वस्त्यांमध्ये घुसून निर्दोष नागरिकांना बेदम मारहाण केली.

सुजात आंबेडकरांनी पोलिसांवर आणि राज्य सत्तेवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, फक्त पोलिसच नव्हे, तर बाहेरून आणलेले गुंड जे मंत्र्यांचे किंवा गावगुंडांचे होते त्यांनीही भीमसैनिकांवर हल्ला केला. हे सगळं व्हिडिओंमधून स्पष्ट दिसत आहे.

मारहाणीत पोलिसही सहभागी

बाबासाहेबांची सही, अशोकचक्र, जय भीम आणि संविधान लिहिलेल्या गाड्याही पोलिसांनी तोडल्या, हे पाहून संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली आहे. प्रियदर्शीनगर येथील हृदयद्रावक घटनेचा उल्लेख करत सुजात आंबेडकर म्हणाले, एका गर्भवती महिलेला रस्त्यावर लोळवत पोलिसांनी मारहाण केली आणि महिला पोलिसही तिथे उपस्थित नव्हत्या.

…तर लढा अधिक तीव्र

सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढलेला परभणी ते मुंबई लाँग मार्च काही दलालांच्या अर्धवट नेतृत्वामुळे अपयशी ठरला. जर कुणी शहीदाच्या बलिदानावर नेतेगिरी करत असेल, तर समाज त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शांतता मार्च शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला असून, राज्यातील संविधान प्रेमी समाजात पोलिस अत्याचारांविरोधात तीव्र संताप आहे. न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा लढा अधिक तीव्र करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News