ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ यात्रेला सुरूवात झाली आहे, येथे भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने चेंगराचेंगरीच्या घटना घडत असतात. समोर आलेल्या माहितीनुसार पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी झाल्याने 40 हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पुरी येथील श्री राजवाड्याजवळ झाल्याचे बोलले जात आहे. मात्र या घटनेत अद्याप कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. चेंगराचेंगरीनंतर अनेक भाविक बेशुद्ध पडले होते. यातील काहींना पुरीच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कशी झाली चेंगराचेंगरी?
शुक्रवारी रथयात्रेतील ‘पहाडी’ सोहळ्यादरम्यान गजपती दिव्य संघदेवाच्या राजवाड्याजवळ लोकांची गर्दी जमली होती. ही गर्दी नियंत्रित करण्यात प्रशासनाला अडचण येत होती. यात गर्दीदरम्यान भाविकांमध्ये गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे भाविकांनी अचानक धावपळ केली, ज्यामुळे काही लोक चेंगरून बेशुद्ध पडले. घटनेत 40 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना पुरी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या जखमींच्या उपचाराची योग्य व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

चेंगराचेंगरीच्या घटना, काळजी घ्या!
याआधी 2024 मध्येही पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी गर्दीत गुदमरून एका भाविकाचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी भगवान जगन्नाथाचा रथ पुरीच्या ग्रँड रोडवरून जात असताना ही घडली होती. त्यामुळे अशी घटना टाळण्यासाठी यंदा प्रशासनाने कडक पावले उचलली होती, मात्र तरीही धोका टळू शकला नाही आणि यंदाही चेंगराचेंगरी झाली.
गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी शांतता राखा. घाई नको. मुलांना हात धरून ठेवा. आपत्कालीन मार्ग माहिती ठेवा. पोलिसांचे निर्देश पाळा. ढकलाढकली करू नका. सामान हलके ठेवा. शक्यतो गर्दीपासून दूर राहा. मदतीसाठी जवळच्यांना सतर्क ठेवा. सुरक्षित अंतर ठेवा. संयम बाळगा.