Padma Awards – विविध क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या 68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने आज नवी दिल्लीत सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सहा कोण?
दरम्यान, या पुरस्कार समारंभात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष डॉ .मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ (मरणोत्तर) तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अच्युत पालव, अश्विनी भिडे-देशपांडे यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पद्म पुरस्कार वितरणाची प्रक्रिया २ टप्प्यात
दुसरीकडे आज उर्वरित 68 पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये 3 पद्मविभूषण, 09 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे यंदाच्या पुरस्कार यादीत एकूण 139 मान्यवरांची निवड करण्यात आली होती. त्यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. तर यंदाच्या पद्म पुरस्कार वितरणाची प्रक्रिया दोन टप्प्यात झाली. पहिल्या टप्पयात 71 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये मध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.