अमेरिकेत 2 खासदारांवर घरात जाऊन गोळीबार; एका महिला खासदार आणि पतीचा मृत्यू

चॅम्पलिन आणि ब्रुकलिन पार्क परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर दोन्ही खासदारांच्या घरी गोळीबार झाल्याचं समोर आलंय.

मिनेसोटा- अमेरिकेत लोकप्रतिनिधींच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या मेनिसोटा भागातील दोन डेमोक्रेटिक पक्षांच्या खासदारांच्या घरात शिरुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय.

पहिल्या घटनेत डेमोक्रेटिक स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह मेलिसा हार्टमॅन आणि त्यांचे पती मार्क यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत डेमोक्रेटिक पक्षाचे स्टेट सिनेटर जॉन हॉफमॅन आणि त्यांची पत्नी येवेट यांच्यावरही गोळीबार करण्यात आलाय. जखमी अवस्थेत या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, शस्त्रक्रिया झाल्यानंतर हे दोघेही वाचले आहेत.

हे हल्ले राजकीय कारणातून झाला असल्याचा संशय मिनेसोटाचे गव्हर्नर टीम वॉल्ज यांनी व्यक्त केलाय. चॅम्पलिन आणि ब्रुकलिन पार्क परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर दोन्ही खासदारांच्या घरी गोळीबार झाल्याचं समोर आलंय. हे प्रकरण सरकारनं गांभिर्यानं घेतलं असल्याचंही गव्हर्नर यांनी स्पष्ट केलंय.

दोन्ही खासदारांच्या घरात बारा किमीचं अंतर

अमेरिकेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही खासदारांच्या घरात १२ किलोमीटरचं अंतर आहे. सिनेटर हॉफमॅन आणि त्यांची पत्नी येवेट यांच्यावर शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास गोळीबार करण्यात आलाय. या दोघांसोबत त्यांची मुलगी होप हीही राहत होती. मात्र गोळीबार झाला त्यावेळी ती घरात नसल्याची माहिती आहे. आता सध्या ती सुरक्षित आहे का, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

दुसरीकडे मेलिसा आणि त्यांच्या पतीवर झालेल्या गोळीबारानंतर संशयितांचा तपास सुरु करण्यात आला आहे. या परिसरात कोणी संशयितानं घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रवेश देण्यात येऊ नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. एखादा एकटा पोलीस अधिकारी घरात येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यालाही प्रवेश देण्यात येऊ नये, असंही सांगण्यात आलंय. हा हल्ला कुणी केला, यामागे नेमकं काय कारण आहे, याचा शोध घेण्यात येतोय. तोपर्यंत पोलिसांनी सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय.

२१ मे रोजी इस्रायली दुतावासातील कर्मचाऱ्यांची हत्या

अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डीसीमध्ये २४ दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात इस्रायली दुतावासातील दोन कर्मचाऱ्यांची रस्त्यावर हत्या करण्यात आली. फ्री पॅलेस्टाईन अशी घोषणाबाजी करत एका हल्लेखोरानं हा गोळीबार केला होता. ज्यू म्युझियमच्या बाहेर पडत असताना या दोघांवर गोळीबार करण्यात आला होता. या दोन्ही कर्मचाऱ्यांचा नुकताच साखरपुडा झाला होता आणि लवकरच हे दोघंही विवाह बंधनात अडकणार होते, त्यापूर्वीच या दोघांचा मृत्यू झाला.

 

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News