वॉशिंग्टन डीसी- 1945 साली संपलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या 80 वर्षांनंतर जागतिक शांतता पुन्हा डगमगत असल्याचं दिसायला लागलं आहे. अमेरिका आणि युरोपातील नागरिक येत्या पाच ते दहा वर्षांत तिसरं महायुद्ध होईल अशी शंका व्यक्त करताना दिसतायेत.
रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेला तणाव, अमेरिकेचं परराष्ट्र धोरण आणि अण्वस्त्रांचा धोका ही तिन्ही कारणं त्यासाठी सांगण्यात येतायेत. याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात युरोप आणि अमेरिकेतील 55 टक्के नागरिकांना येत्या काही काळात तिसरं महायुद्ध होईल, असं वाटतंय.

तिसरं महायुद्ध ठरणार अधिक विध्वंसक
या तिसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बचा वापर होईल असंही 76 टक्के नागरिकांना वाटतंय. दुसऱ्या महायुद्धापेक्षा तिसऱ्या महायुद्धात जास्त हानी होईल, अशीही भीती व्यक्त करण्यात येतेय. अमेरिका आणि युरोपातील अनेक राष्ट्रही या महायुद्धात सामील होतील असाही अंदाज वर्तवण्यात येतोय.
इस्लामिक दहशवादाचाही मोठा धोका
पशअचिम युरोप आणि अमेरिकेत करण्यात आलेल्या सर्वेत 60 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी रशियासोबत असलेला तणाव हे महायुद्धाचं महत्त्वाचं कारण ठरेल, अशी शक्यता व्यक्त केलीय. रशियासोबतच इस्लामिक दहशतवाद हेही मोठं संकट असल्याचं मानण्यात येतंय. दहशतवाद्याच्या मुद्द्यावर तातडीनं नियंत्रण मिळवण्याची गरज व्यक्त करण्यात येतेय.
जागतिक पातळीवर वाढती अशांतता
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेला संघर्ष, रशिया आणि युक्रेनचं लांबलेलं युद्ध, भारत आणि पाकिस्तानातील वाढता तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांची परराष्ट्र धोरणं यामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये आधीच अस्वस्थता आहे. यातच संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय. याची परिणिती तिसऱ्या महायुद्धात होईल, याची भीती सगळ्यांना वाटतेय.