मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये माजी IAS अधिकारी प्रवीण परदेशी यांची एन्ट्री झाली आहे. परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
परदेशी यांना मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार हे पद देऊन देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांकडे असलेल्या अर्थखात्यात घुसखोरी केली असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. ते म्हणाले, या नियुक्तीने सर्वच धोरणात्मक निर्णय आणि प्रशासकीय निर्णय हे आर्थिक सल्लागाराच्या अखत्यारीत येतील म्हणजे ते मुख्यमंत्र्यांकडे येतील.

मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून एकप्रकारे अजितदादांच्या अर्थखात्यात देखील घुसखोरी केलेली आहे. यापुढे अर्थ खात्याचे सर्वच धोरणात्मक निर्णय आणि पर्यायाने सर्वच प्रशासकीय निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक… pic.twitter.com/iU2uj9TfyQ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 14, 2025
शिंदेंनंतर आता अजितदादांचा नंबर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागील अडीच वर्षांच्या निर्णयांचा आढावा घेत एकनाथ शिंदेंच्या खात्यामध्ये घुसखोरी केली आता अजित पवारांचा नंबर असून त्यांच्या खात्यात घुसखोरी केली जाणार असा देखील दावा रोहित पवारांनी केला. तसेच मुख्यमंत्र्यांना प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष-अपत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिल्याचे ते म्हटले.
मित्रपक्षांना संपवणे भाजपची कुटनीती
रोहित पवार यांनी भाजपवर देखील टीका केली. ते म्हणाले, मित्रपक्षांकडे भाजप तात्पुरती सोय म्हणून पाहतो. गरज संपताच त्यांची तात्पुरती सोय देखील संपते. बाहेर असणारांना ते कळते मात्र शिकार होणाऱ्या पक्षाला मात्र शिकार होईपर्यंत कळत नाही.