दिल्ली: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 मध्ये पहिल्यांदाच पॉइंट्स टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. अवघा सीझन अनेक संघांना नाकीनऊ आणणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा आरसीबीने दारूण पराभव केला. कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील बंगळुरूने रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव केला. यासह, बंगळुरूने हंगामातील आपला सातवा विजय नोंदवला. कृणाल पांड्याच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बंगळुरूने अविस्मरणीय विजय मिळवला.

Cooked without Salt. 😬
Good night, 12th Man Army! pic.twitter.com/j7V2MtjODQ
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 27, 2025
म्हणून दिल्ली हरली!
सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची खराब सुरुवात झाली. 33 धावांवर पहिली विकेट गमावली. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला अभिषेक पोरेल 11 चेंडूत 28 धावा करून आऊट झाला. यानंतर, करुण नायर 4 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला आणि चाहत्यांच्या आशा धुळीस मिळाल्या. फाफ डु प्लेसिस आणि केएल राहुल यांनी जबाबदारी सांभाळली आणि संघाचा धावसंख्या 50 च्या पुढे नेला. डु प्लेसिस सेट झाला होता, पण त्याच्या बॅटमधून वेगाने धावा येत नव्हत्या. तो दबावाखाली दिसत होता, ज्याचा फायदा कृणाल पांड्याने घेतला आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
के.एल राहुलने एक बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. 17 व्या षटकात भुवनेश्वर कुमारने त्याची विकेट घेत आरसीबीला मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला. राहुल 39 चेंडूत 3 चौकारांसह 41 धावा काढून आऊट झाला. दिल्लीचे फलंदाज फार काळ तग धरू शकले नाहीत. परिणामी संघाचा डाव अवघ्या 162 धावांवर आटोपला.
कोहली, पांड्या बरसला, आरसीबीचा विजय
162 धावांचा पाठलाग करताना आरसीबीच्या कृणाल पंड्या आणि विराट कोहली यांने संघाची सुत्र हातात घेतली. दोघांमध्ये 83 चेंडूत 113 धावांची मोठी भागीदारी झाली, ज्यामुळे आरसीबीच्या आशा जिवंत राहिल्या. पण, अर्धशतक ठोकल्यानंतर, कोहलीने 18 व्या षटकात आपली विकेट गमावली. मात्र कृणाल पांड्या ठाम राहिला. पांड्याने 47 चेंडूत 73 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच वेळी, कोहलीने 51 धावा केल्या आणि 4 चौकार मारले. आरसीबीने 19 व्या षटकात सामना जिंकला आणि दोन गुण जोडले.
या विजयामुळे आरसीबी गुणतालिकेत टॉपवर पोहोचली आहे. आरसीबीने 10 पैकी 7 सामने जिंकत 14 गुण मिळवले आहेत. हाच विजयाचा सिलसिला कायम राहिल्यास आरसीबी आयपीएल चषक जिंकण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.