पाकिस्तानच्या युट्यूब न्यूज चॅनल्सना भारतात बंदी, केंद्राचं मोठं पाऊल

पाकिस्तानी न्यूज चॅनल्सवर भारतात बंदी...सरकारचा मोठा निर्णय.

नवी दिल्ली: 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी घटनेनंतर अनेक पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सवर बंदी घातली आहे. पाकिस्तानातील ज्या 16 युट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्यात आली आहे, या कारवाईने पाकीस्तानी माध्यमांना मोठा धक्का बसला आहे. पाकीस्तानला आता भारताकडून सातत्याने धक्के दिले जात आहेत.

16 चॅनल्सवर बंदी:

भारत सरकारने बंदी घातलेल्या 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सचे एकूण 63.08 दशलक्ष म्हणजेच 6.3 कोटींहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्यापैकी जिओ न्यूजच्या युट्यूब चॅनलचे सर्वाधिक 18.9 दशलक्ष म्हणजेच 1.8 कोटी सबस्क्राइबर्स आहेत. त्याचप्रमाणे एआरवाय न्यूजचे सुमारे 14.6 दशलक्ष म्हणजेच 1.4 कोटींहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. यानंतर समा न्यूजचे सुमारे 12.7 दशलक्ष म्हणजेच 1.2 कोटींहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. यामुळे पाकीस्तानच्या अफवा आणि आक्षेपार्ह आशयावर देशातील शांततेला बाधा होणार नाही.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून सतत कठोर निर्णय घेतले जात आहेत. आता भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशींनंतर पाकिस्तानच्या अनेक युट्यूब चॅनल्सवर बंदी आणण्यात आली आहे. या चॅनल्समध्ये माजी क्रिकेटर शोएब अख्तर आणि आरजू काझमी यांसारख्या मोठमोठ्या युट्यूब चॅनल्सचाही समावेश आहे. त्याचसोबत प्रमुख मीडिया हाऊसच्या युट्यूब चॅनल्सवरही भारतात बंदी घातली आहे. दहशतवाद्यांना उग्रवादी म्हटल्याने बीबीसीला पत्र पाठवलं गेलंय.

 

16 चॅनेल्स कोणते?

पाकिस्तानातील ज्या 16 युट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्यात आली आहे, त्यात शोएब अख्तरचं चॅनल तसंच तिथल्या अनेक प्रमुख मीडिया हाऊसेसचे युट्यूब चॅनल्स यांचा समावेश आहे. डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार टीव्ही, द पाकिस्तान रेफरन्स, जिओ न्यूज, समा स्पोर्ट्स आणि उजैर क्रिकेट हे त्यात प्रमुख आहेत.

दरम्यान पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना उग्रवादी म्हटल्याने भारत सरकारने बीबीसीला पत्र लिहिलं आहे. सरकारने बीबीसीच्या दहशतवाद्यंना उग्रवादी म्हटल्याच्या त्यांच्या रिपोर्टवर औपचारिक पत्र पाठवून उत्तर मागितलं आहे.

22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन याठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 27 पर्यटक मारले गेले. एप्रिल आणि मे महिन्यात काश्मीरमध्ये असंख्य पर्यटक फिरायला जातात. याच गोष्टीचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. या घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर अनेक प्रकारच्या कारवाया पाकविरोधात सुरू आहेत.


About Author

Rohit Shinde

Other Latest News