मुंबई : मुंबई बीकेसी येथील जियो वर्ल्ड सेंटर येथे १ मे पासून ४ मे २०२५ पर्यंत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे १ मे रोजी उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्राची संस्कृती-परंपरा ओळख…
दरम्यान, उद्योग मंत्री सामंत यांनी म्हणाले की, पर्यटनाच्या दृष्टीने देखील महाराष्ट्र या देशाच्या पातळीवर अन्य देशांशी स्पर्धा करतो आहे. म्हणून पर्यटनाची सगळी स्थळे जागतिक पातळीवर जावी, हा देखील या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा उद्देश आहे. तसेच महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची सांस्कृतिक संस्कृती, औद्योगिक संस्कृती, पर्यटन संस्कृती आणि ज्या काही महाराष्ट्राच्या परंपरा आहेत. त्या जागतिक पातळीवर जाव्यात, यासाठी मुंबई शहराची निवड केंद्र शासनाने केली आहे, असे यावेळी सामंत यांनी सांगितले.

विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार…
यावेळी स्पष्ट केले की, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीचे माहेरघर हे मुंबईला म्हटले जाते. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी याच महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट सुरू केले. त्यामुळे मनोरंजनाच्या क्षेत्रात मुंबई ही देशात अग्रगण्य शहर आहे. त्याचबरोबर, गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक ही एक नंबरला आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात देखील महाराष्ट्र आणि मुंबई एक नंबरला राहिलेले आहे. या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे. पंतप्रधान मोदी १ मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत. सोबत परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचाही सहभाग राहणार आहे.