‘जो तू है सो मैं हूं…’ अद्वैत तत्त्वज्ञानाबद्दल सांगताना आनंदपूर धाम अशोकनगरमध्ये पीएम मोदी म्हणाले, ‘हा विचार ‘तू आणि मी’मधील भेद दूर करतो’

कार्यक्रमात उपस्थित मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यावेळी म्हणाले, पंतप्रधान मोदींचा हा दौरा अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून राष्ट्राला गुरू परंपरेच्या मूल्यांशी जोडण्याचं एक सशक्त माध्यमही सिद्ध होईल.

PM Modi Anandpur Dham Ashok Nagar: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मध्यप्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील इसागड तालुक्यात असलेल्या आनंदपूर धाम येथे भेट दिली. येथे त्यांनी श्री परमहंस अद्वैत मंदिरात पूज्य गुरूजी महाराजांची पूजा-अर्चा करीत देशातील नागरिकांसाठी अध्यात्मिक ऊर्जा, एकता आणि शांततेची इच्छा व्यक्त केली. याशिवाय त्यांनी आनंद तलावात फूलंही अर्पण केली.

आनंदपूर धाममधील अध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आलं होतं. मंदिरात पूजा केल्यानंतर मुख्य कार्यक्रमात संतांनी मोलाचा उपदेश दिला. ते म्हणाले, देवाचं नाव हेच सत्य आहे, यासाठी आपण सर्वांनी गुरुमुख देवाचं नामस्मरण करावं. कारण हेच सत्य आहे. बाकी सर्व खोटं आहे. आम्ही पंतप्रधान मोदींना सद्मार्गावर चालण्यासाठी आशीर्वाद देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जनतेला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, आज जगात भौतिक प्रगतीदरम्यान मानवतेसाठी युद्ध, संघर्ष आणि मानवीय मूल्यांशी संबंधित अनेक प्रश्न आमच्या समोर उभे ठाकले आहेत. हे प्रश्न, चिन्हा आणि आव्हानांच्या मुळाशी काय आहे? याच्या मूळाशी आहे आपले आणि परकेपणाची भावना. अशी मानसिकता माणसाला माणसापासून दूर करते. आज जगभरात याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र याचं उत्तर अद्वैत विचारांमध्ये आहे. अद्वैत म्हणजे जिथं कोणी द्वैत नाही.

‘जो तू है सो मैं हूँ’ हा विचार माझ्या आणि तुझ्यातील भेद दूर करतो…

मोदी यावेळी म्हणाले, अद्वैत म्हणजे ज्यात एकच ईश्वर असतो. याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर संपूर्ण सृष्टीला ईश्वराच्या रुपात पाहण्याचा विचार म्हणजे अद्वैत. या अद्वैत सिद्धांताला परमहंस दयाल महाराज सरळ शब्दात म्हणतात, जो तू है सो मैं हूँ. हा विचार तू आणि मी मधील भेद दूर करतो. सर्वांनीच हा विचार आत्मसात केला तर सर्व वादच संपून जातील. पुढे पीएम मोदी म्हणाले, सेवाभावापेक्षा मोठं दुसरं तिसरं काही नाही हे आनंदपूर धाममध्ये आल्यावर जाणवतं.

सेवाभाव हा आमच्या सरकारच्या केंद्रस्थानी…

पंतप्रधान मोदी म्हणाले, सेवाभाव आज आमच्या सरकारच्या प्रत्येक प्रयत्नात केंद्रस्थानी आहे. आज देशातील प्रत्येक गरजूला भुकेची चिंता नाही, प्रत्येक गरीब आणि वृद्धाला उपचाराची चिंता नाही, प्रत्येक गरीबाकडे पक्कं घर आहे. आज गावागावांमध्ये पाणी पोहोचत आहे. एम्स, आयआयटी, आयआयएम सुरू होत आहेत, गरीबांची मुलं या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. पर्यावरणाला वाचविण्यासाठी ‘एक झाड आईसाठी’ ही योजना सुरू आहे. देश इतकं काही करतोय, यामागे आमचा सेवाभावच आहे.

सेवाच आमच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा देते…

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, गरीब आणि वंचितांच्या उत्थानाचा संकल्प, ‘सबका साथ सबका विकास’चा मंत्र…सेवेची ही भावना आज आमच्या सरकारची नीतीही आहे आणि निष्ठाही आहे. ते पुढे म्हणाले, जेव्हा आम्ही सेवा या संकल्पाशी जोडले जातो, तेव्हा आम्ही दुसऱ्याच्या भल्याचाच विचार करतो. सेवेची भावना आमच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा देते. आपला विचार व्यापर करते. सेवेमुळे आपण स्वत:च्या चौकटीतून बाहेर पडलो आणि समाज, राष्ट्र आणि मानवतेसारख्या मोठ्या उद्देशांशी जोडले जातो.

 

 

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News