यंदा मे महिन्यातच देशात मान्सूनचे आगमन झाले आहे. देशाच्या दक्षिणेकडील भागात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. मे महिन्यात भारतातील अनेक राज्यांमध्ये झालेल्या पावसाने अनेक दशकांचे विक्रम मोडले आहेत. शिवाय, मे महिन्यात उष्णतेची लाट असते, पण यंदा ती नाहीशी झाली आहे.
हवामान विभागाने काय म्हटले?
आता हवामान खात्याने जून महिन्याच्या हवामानाबाबत एक भाकित केले आहे. हवामान खात्याने म्हटले आहे, की जूनमध्ये देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाच्या बहुतेक भागात कमाल तापमान सामान्य राहील.

एका कार्यक्रमात पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी सांगितले की, जून महिन्यात देशभरात सरासरी १६६.९ मिमी पावसाच्या तुलनेत १०८ टक्के अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र, देशाच्या काही दक्षिणेकडील भागांमध्ये तसेच उत्तर-पश्चिम आणि ईशान्य भारतातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो.
दरम्यान, आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, चांगल्या पावसामुळे, वायव्य आणि ईशान्य भारतातील अनेक भाग वगळता देशातील बहुतेक भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहू शकते.
ढगाळ हवामानामुळे, मध्य भारत आणि लगतच्या दक्षिणेकडील काही भाग वगळता देशाच्या बहुतेक भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
जून ते सप्टेंबर दरम्यान १०६ टक्के पावसाचा अंदाज
आयएमडीचे महासंचालक म्हणाले की, जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरी ८७ सेमीपर्यंत १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतात सामान्य पाऊस होण्याची शक्यता आहे, तर ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो.
या हंगामात मान्सून कोअर झोनमध्ये (दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्क्यांपेक्षा जास्त) सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. या झोनमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि आजूबाजूचे भाग यांचा समावेश होतो.
लडाख, हिमाचल प्रदेशच्या आसपासचे भाग, ईशान्य राज्ये तसेच बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागांना वगळता देशातील बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, केरळ आणि तामिळनाडूच्या काही विशिष्ट भागांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो.
२००९ नंतर पहिल्यांदाच मान्सून लवकर आला
नैऋत्य मान्सून २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला, २००९ नंतर मान्सून वेळेपेक्षा लवकर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईत सामान्य तारखेच्या १६ दिवस आधी पाऊस सुरू झाला. नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जूनपर्यंत केरळमध्ये प्रवेश करतो, ११ जूनपर्यंत मुंबईत पोहोचतो आणि ८ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. १७ सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य भारतातून परत जाण्यास सुरुवात करतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे परत जातो.