राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. खरीप हंगाम सुरू असूनही अनेक बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. सरकारने सिबिल स्कोअरकडे दुर्लक्ष करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात बँका सिबिल तपासूनच कर्जवाटप करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे अनेक शेतकरी कर्जफेड करण्याऐवजी माफीची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत जुनी कर्जे थकीत असल्याने शेतकऱ्यांना नवीन कर्जे मिळण्यास अडचणी येत आहेत.
20 लाख शेतकऱ्यांची थकबाकी
राज्यातील 20 लाख 37 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज फेडलेले नसून, थकबाकीची रक्कम तब्बल 31,254 कोटी इतकी झाली आहे. ही माहिती राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आली आहे. बीड, बुलढाणा, जालना, नांदेड, परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यांत प्रत्येकी दीड लाखांहून अधिक शेतकरी कर्ज थकवणाऱ्यांच्या यादीत आहेत. राज्यातील एकूण 1.29 कोटी शेतकऱ्यांपैकी जवळपास 20 लाख शेतकरी कर्ज थकवलेले असून, त्यामुळे त्यांना बँकांकडून नवीन कर्ज मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे. अतिवृष्टी, हमीभावाचा अभाव, उसाचे अपूर्ण पैसे आणि निसर्गाच्या तडाख्यामुळे त्यांची स्थिती आणखी बिकट झाली आहे.

कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी?
राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकी आहे. यामध्ये नाशिक (2790 कोटी), सोलापूर (2681 कोटी) आणि यवतमाळ (2256 कोटी) जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात मात्र थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या काहीशी कमी असल्याची बाब समोर येत आहे. दुसरीकडे सरकारने शेतकऱ्यांना सिबिल न तपासता बँकांनी कर्ज द्यावे, असे सांगितलेले असताना त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
सरकारने जाहीर केले आहे की शेतकऱ्यांना कर्ज देताना त्यांची सिबिल स्कोअर तपासली जाऊ नये, जेणेकरून अधिकाधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकेल. मात्र, प्रत्यक्षात बँका अजूनही सिबिल स्कोअर पाहूनच कर्ज मंजूर करत आहेत. यामुळे अनेक गरजू शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जात आहे. सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, अन्यथा शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक वाढतील. बँकांनी शेतकऱ्यांचा विश्वास जपला पाहिजे व धोरणांनुसार व्यवहार केला पाहिजे. योग्य अंमलबजावणीसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. शेतकरी देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आणि त्यांना योग्य आर्थिक मदत मिळाली पाहिजे.