मुंबई: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा वातावरणात बदल होणार आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात सर्वत्रच उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक उष्णतेचा सामना करावा लागू शकतो, असे आयएमडीने म्हटले आहे.
मुंबईमध्ये तापमानात वाढ
सध्या मुंबईमध्ये तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी कुलाबा आणि सांताक्रूझ या ठिकाणी 39 अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे. ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांना सकाळपासूनच उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गेले दोन ते तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये उष्ण हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

विदर्भात उष्णतेचा कहर
तिकडे विदर्भात तर उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय, पारा 42 अंशांच्या पार जावून पोहोचलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम विदर्भातील हवामानावर झाल्याचं चित्र आहे. अकोला शहरात 42 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. येत्या काही दिवसांमध्ये ही उष्णतेची लाट अशीच कायम राहण्याचा अंदाज आहे.
पूर्व भारतासह उत्तर-पश्चिमी मैदानी भागांमध्ये अधिक उष्णता पाहायला मिळत आहे. राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या उत्तर भागांमध्ये उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. विशेषत: उत्तर प्रदेशाचा पूर्वेकडील भाग, झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांमध्ये 10 ते 11 दिवस उष्ण वारे वाहू शकतात.
गेल्यावर्षी भारतात अशाचप्रकारे उष्णतेची लाट पसरली होती. हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा वारंवार आणि अधिक तीव्र होत असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. 2022 च्या एका अभ्यासानुसार, 21 व्या शतकात उष्णतेच्या लाटेचा धोका 10 पटीने वाढू शकतो. तसेच भारताच्या 70 टक्क्यांहून अधिक ठिकाणी याचा फटका बसू शकतो.
काळजी घ्या
या दिवसांमध्ये उष्माघाताने जीव गमावण्याची वेळ अनेकांवर येत असते. अशा परिस्थितीत काळजी घेणं गरजेच आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 4 या वेळेत शक्यतो उन्हात जाणं टाळावं, त्याचबरोबर पाणी आणि थंड पेयांचा आधार घ्यावा. जेणेकरून आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होईल. आणि उष्माघातापासून बचाव होईल. पाण्याचे प्रमाण वाढवावे.