गुजरात: गुजरातच्या समुद्रात ड्रग्ज संदर्भात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएसच्या संयुक्त कारवाईत तब्बल 1800 कोटी रुपयांचा ड्रग्जसाठा असणारी बोट पकडली आहे. सुमारे 300 किलो एमडी ड्रग्ज या बोटीतून जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमावर्ती भागात करण्यात आली आहे.
घडलेला घटनाक्रम असा की…
ड्रग्ज वाहतूक करणारी बोट रात्रीच्या अंधारात समुद्रातून पाकिस्तान भागातून भारतात येत होती, दरम्यान गुजरात कोस्ट गार्डच्या स्पीड बोट्स आणि मोठ्या जहाजांनी सिने स्टाईल पाठलाग करत ही बोट थांबवली. कसून तपासणी केली असता बोटीत जवळपास 1800 कोटींचं एमडी ड्रग्ज सापडलं. ही अत्यंत घातक आणि महागडी ड्रग्ज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत सुमारे 1800 कोटी रुपये आहे.

12 आणि 13 एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या या कारवाईत हे ड्रग्ज पकडण्यात आले, तटरक्षक दलाला रात्रीच्या काळोखात एक संशयित बोट किनाऱ्याच्या जवळ येत असल्याचे आढळले. सतर्क झालेल्या तटरक्षक दलाने संशयित बोटीचा पाठलाग केला असता तटरक्षक दलाच्या पथकाला समुद्रात टाकण्यात आलेले अंमली पदार्थ आढळल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर जप्त केलेले अंमली पदार्थ पुढील तपासणीसाठी आयसीजी जहाजाने पोरबंदरला आणण्यात आले आहेत. त्यांनी गुजरात एटीएसच्या मदतीने ही कारवाई केली. कारवाईदरम्यान बोटीत असलेल्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
मासेमारीच्या नावाखाली ड्रग्जचा काळा धंदा:
या कारवाईनंतर आता मासेमारीच्या नावाखाली समुद्रात ड्रग्जचा काळा धंदा सुरू असल्याचं उघड झालं आहे. या कारवाईत कोस्ट गार्डला सापडलेली बोट पश्चिम बंगालमधील काकद्वीप मासेमारी बंदरात नोंदणीकृत होती. तपासणी दरम्यान, ती वैध नोंदणी कागदपत्रांशिवाय असल्याचे आढळून आले. त्यामुळे या बोटीची चोरी झाल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. जहाजावरील 14 भारतीय क्रू सदस्यांपैकी एकाही सदस्याकडे मासेमारीसाठी अनिवार्य असणारी अधिकृत कागदपत्र नव्हती. जहाजातील कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांपासून समुद्रात असल्याचा दावा केला असला तरी बोटीत मासेमारीचे कोणतेही साहित्य नव्हते आणि मासे पकडण्याचे साधनही आढळले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.