अयोध्या राम मंदिर परिसरात उद्या ‘रामदरबारा’ची प्राण-प्रतिष्ठा, आतापर्यंत कोणकोणते विधी झाले?

राम मंदिर परिसरात भगवान शिव, गणेश, हनुमान, सूर्य, भगवती, अन्नपूर्णा आणि शेषवतार यासारख्या विविध देवतांना समर्पित मंदिरं स्थापन करण्यात आली आहेत.

अयोध्येतील राम मंदिर परिसरात प्राण-प्रतिष्ठेच्या तीन दिवसीय कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. ३ जूनपासून सुरू झालेल्या या भव्य कार्यक्रमात श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसरात राम दरबाराची स्थापना केली जाणार आहे. याशिवाय राम मंदिर परिसरातील ७ मंदिरात मूर्तींची प्राण-प्रतिष्ठा केली जात आहे. मंगळवारी वैदिक अनुष्ठानाचा पहिला दिवस पार पडला. बुधवारी आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दुसरा दिवस आहे.

गुरुवारी या अनुष्ठानाचं समापन होईल. या वैदिक अनुष्ठानावरुन भगवान श्रीरामाची जन्मभूमी अयोध्या दिव्यांनी उजळून निघाली आहे.

पहिल्या दिवशी सकाळी सहा वाजेपासून अनुष्ठानाला सुरुवात…

मंगळवारी अनुष्ठानाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सकाळी सहा वाजेपासून झाली. सकाळी ६ ते ६.३० पर्यंत ब्रम्ह यज्ञ झाला.

पंचाग पूजेनंतर मंडपात केली वास्तू पूजा…

यानंतर पंचाग पूजन झालं. ज्यामध्ये सर्वप्रथम गणपती पूजन, वरुण पूजन, सत्यपीत मातृकाचे पूजन, ब्राह्मण वरण असे उपक्रम संपन्न झाले. यानंतर मंडप प्रवेश झाला. यज्ञ भवनात खोदकामामुळे निर्माण होणारे दोष दूर करण्यासाठी वास्तुपूजन करण्यात आले.

अरणी मंथनच्या माध्यमातून सर्व कुंडांमध्ये अग्नी प्रज्वलित…

श्रीराम दरबार (सीता-राम, भरत, लक्ष्मण, शत्रुधन, दास हनुमान) याची पूजा करण्यात आली. कुंडांची पूजा करण्यात आली. यानंतर अरणी मंथनातून अग्नी उत्पन्न करीत सर्व कुंडांमध्ये अग्नीचं आवाहन करण्यात आलं. क्षेत्रपालाची पूजा करण्यात आली. ग्रहांच्या मंत्रांनी हवन करण्यात आलं. प्रत्येक कुंडात ज्या ८ देवतांच्या मूर्तींना अभिषेक करायचा होता त्यांच्या मंत्रांनी १०८ आहुती देण्यात आल्या.

पहिल्या दिवसाच्या पूजेनंतर रात्रभर मूर्ती पाण्यात ठेवतात…

मंदिरांमध्ये कर्मकुंडी प्रक्रिया करण्यात आली. जलाधिवास झाला. यावेळी सर्व मूर्ती पाण्यात ठेवण्यात आल्या. मंगळवारी रात्रभर सर्व मूर्ती पाण्यात होत्या, बुधवारी सकाळी मंडपात पुन्हा गणेश पुजेसह अनुष्ठानाची सुरुवात होईल. अन्नाधिवासानंतर सर्व मूर्तींसाठी औषधी आणि शय्याधिवास विधी आयोजित करण्यात आले होते.

मूर्तींना औषधी वनस्पतीचं स्नान…

औषधी वनस्पतींनी मूर्तींना स्नान घालण्यात आले. ज्यामुळे त्यांची शुद्धता आणि दिव्यता वाढते. शय्यधिवासात, मूर्तींना एका खास पलंगावर विश्रांती दिली जाते, जी प्राणप्रतिष्ठेच्या प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग आहे.

 

 

 

 

 

 

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News